पालिकेची नागरिकांप्रति उदासीनता
By Admin | Updated: September 6, 2016 00:52 IST2016-09-06T00:52:46+5:302016-09-06T00:52:46+5:30
महापालिकेच्या प्रबोधनात्मक व माहितीपर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी देण्याचा नियम उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आला

पालिकेची नागरिकांप्रति उदासीनता
दीपक जाधव,
पुणे- गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांकडून कमानींवर केल्या जाणाऱ्या एकूण व्यावसायिक जाहिरातींच्या एकपंचमांश (१/५) जागा महापालिकेच्या प्रबोधनात्मक व माहितीपर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी देण्याचा नियम उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आला आहे. मात्र, या नियमाचे पालन करण्याबाबत महापालिका प्रशासनच उदासीन असल्याने लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सोप्या मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे.
मिळकत कराची अभय योजना सुरू केलीय; मात्र अजून बहुतांश लोकांपर्यंत ती न पोहोचल्याने प्रतिसाद कमी आहे. मीटरने पाणी योजना काय आहे, समलेलेच नाही. अशा अनेक समस्यांना पालिकेला तोंड द्यावे लागत आहे. गणेशोत्सवामध्ये लाखो पुणेकर आवर्जून बाहेर पडतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या कमानींवर जाहिरात लावण्यासाठी व्यावसायिक कंपन्या प्रचंड खर्च करीत असतात. महापालिकेला मोठ्या प्रमाणात जागा जाहिरातींसाठी मोफत उपलब्ध होत असताना त्याचा विनियोग करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शहरात साधारणत ६ हजार गणेश मंडळे आहेत. त्यांपैकी १,८०० गणेश मंडळे मोठी आहेत. त्यातील अनेक मंडळांकडून जाहिरातींच्या कमानी लावल्या जातात. त्याच्या प्रायोजकत्वातून गणेश मंडळांना कोट्यवधी रुपये मिळतात.
कंपन्यांच्या प्रायोजकत्वातून मिळणाऱ्या निधीमुळे अनेक मंडळांना आता लोकांकडून वर्गणी गोळा करण्याचीही आवश्यकता उरलेली नाही. या प्रत्येक मंडळांच्या कमानीची एकपंचमांश जागेचा विचार केल्यास महापालिकेला मोफत उपलब्ध होणारी कोट्यवधी रुपयांची जागेवर जाहिरात करण्याकडे पालिकेच्या उदासीनमुळे पाणी फेरले जात आहे.
>टोल फ्री क्रमांकाची माहितीच नाही : उपायांवर पडले पाणी
कचराकुंडी भरून वाहते आहे, रस्त्यांवर खड्ड पडलेयत, पाणी आले नाही, ड्रेनेज तुंबलेय, टॅक्स कुठे भरायचा, मिळकत कराच्या अभय योजनेत कसे सहभागी व्हायचे यासह महापालिकेशी संबंधित सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महापालिकेने १८००१०३०२२२ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. केवळ एका फोनवर नागरिकांच्या तक्रारी नोंदवून त्याची सोडवणूक केली जात आहे. मात्र, या टोल फ्री क्रमांकाची पुरेशी माहिती लोकांपर्यंत पालिकेला पोहोचलेली नाही. गणेशोत्सवामध्ये हा क्रमांक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची संधी महापालिकेकडे गणेशोत्सवानिमित्त आहे.
>नियम बनविला; पण अंमलबजावणीचे सांगितलेच नाही
गणेश मंडळांच्या कमानीवरील एकपंचमांश जागेवर पालिकेची जाहिरात करण्याची जबाबदारी गणेश मंडळांवर टाकण्यात आलेली आहे. मात्र, गणेश मंडळांनी पालिकेच्या कोणत्या जाहिराती कराव्यात, याविषयी त्यांना प्रशासनाकडून काहीच सांगण्यात आलेले नाही. गणशोत्सवापूर्वी महिनाभर अगोदार महापालिकेकडून शहरातील सर्व गणेश मंडळांची बैठक घेतली जाते, त्या वेळी ही माहिती त्यांना देणे अपेक्षित होते. त्यामुळे एका चांगल्या उपक्रमाची अंमलबजावणी रखडली आहे.
गणेश मंडळांना व्यावसायिक जाहिराती लावायच्या असल्यास मंडळापासून ५० मीटर अंतरापर्यंत कमानी लावता येतात. यासाठी पालिकेकडे त्यांना ५०० रुपये शुल्क भरावे लागते. या सर्व जाहिरातीमधील एकपंचमांश जागेवर महापालिकेच्या उपक्रमाची जाहिरात करणे बंधनकारक आहे. जर एकापेक्षा जास्त मंडळे ५० मीटरच्या आत येत असतील, तर त्या मंडळांना समप्रमाणात विभागून जाहिराती लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
मात्र, कोणत्याही मंडळाला मंडपापासून ५० मीटरपेक्षा जास्तीच्या जागेवर रनिंग मंडप टाकून जाहिराती लावता येणार नाहीत. जाहिरातींबाबत काही तक्रारी आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मंडळावर असणार आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाची परवानगी घेऊन या जाहिराती मंडळांना करता येणार आहेत आदी नियम महापालिकेच्या मंडप धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.