नैराश्यग्रस्त तरूणाने लोकलच्या महिलांच्या डब्याला लावली आग
By Admin | Updated: January 24, 2016 14:58 IST2016-01-24T12:56:09+5:302016-01-24T14:58:03+5:30
एका नैराश्यग्रस्त तरूणाने चर्चगेट- मरीन लाइन्स स्थानकादरम्यान उभ्या असलेल्या एका रिकाम्या लोकलच्या महिलांच्या डब्याला आग लावल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.

नैराश्यग्रस्त तरूणाने लोकलच्या महिलांच्या डब्याला लावली आग
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - एका नैराश्यग्रस्त तरूणाने चर्चगेट- मरीन लाइन्स स्थानकादरम्यान उभ्या असलेल्या एका रिकाम्या लोकलच्या महिलांच्या डब्याला आग लावल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. रेल्वे अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा नागपूरचा असलेला हा तरूण गेल्या सहा महिन्यांपासून बेकार असून तो नैराश्याचा सामना करत आहे. तुरूंगात गेलो तर घरच्यांचा त्रास सहन करावा लागणार नाही, या विचारानेच आपण हे कृत्य केल्याचे त्या तरूणाने सांगितले, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
सफाईसाठी ही लोकल रविवारी पहाटे चर्चगेट-मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान उभी करण्यात आली होती. पहाटे चारच्या सुमारास सहा कर्मचारी गाडीच्या साफसफाईचे काम करत असतानाच महिलांच्या डब्याला आग लागल्याचे एका कर्मचा-याच्या लक्षात आले. आग विझवण्यासाठी त्यांनी तत्काळ तिथे धाव घेतली असता तो तरूण त्यांना डब्याच्या दरवाज्याजवळ निश्चलपणे बसल्याचे दिसला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनतर ती आग विझवण्यात कर्मचा-यांना यश मिळाले मात्र आगीत महिलांच्या डब्यासह शेजारील डब्याचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान त्याच त्या तरूणाला ताब्यात रेल्वे पोलिसांनी घेतले आहे.
यापुढे असे अनुचित प्रकार टाळण्यासाठी साफसफाईच्या वेळेस सुरक्षेत आणखी वाढ करण्यात येईल, असे अधिका-यांनी सांगितले.