देवरूखचा सागर राष्ट्रीय इनडोअर हॉकी संघात
By Admin | Updated: November 25, 2014 00:31 IST2014-11-25T00:19:43+5:302014-11-25T00:31:57+5:30
नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत सागर पवार याने राज्याच्या संघातून चमकदार कामगिरी करीत बलाढ्य पंजाब संघावर मात केली.

देवरूखचा सागर राष्ट्रीय इनडोअर हॉकी संघात
देवरुख : इयत्ता अकरावीमध्ये हॉकीची स्टीक हाती घेतलेल्या आणि ग्रामीण भागातून अतिशय खडतरपणे कठोर परिश्रम घेत संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावच्या सागर शांताराम पवार या खेळाडूने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून केलेल्या चमकदार प्रदर्शनाच्या जोरावर त्याची राष्ट्रीय इनडोअर हॉकी संघात निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत सागर पवार याने राज्याच्या संघातून चमकदार कामगिरी करीत बलाढ्य पंजाब संघावर मात केली. या अटीतटीच्या लढ्यात महाराष्ट्राचा गोलकिपर म्हणून उत्कृष्ट बचाव केला होता. याच जोरावर राष्ट्रीय निवड समितीने त्याची राष्ट्रीय संघात निवड केली.
सागर हा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा संगमेश्वर तालुक्यातील मारळ या ग्रामीण भागातील खेळाडू आहे. आता तो ‘मलेशिया- पेनांग’ येथे भारतीय संघातून गोलकिपर म्हणून खेळणार आहे. सागर पवार हा सध्या अमरावती येथील राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये सहभागी आहे. त्याची निवड झाल्याचे पत्र २२ नोव्हेंबर रोजी राज्य हॉकी असोसिएशनला इनडोअर हॉकी असोसिएशन इंडियाने केले होते. त्यामध्ये निवड झाल्याचे सांगून पासपोर्ट व्हीसा काढण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते.
सागर पवारचे शालेय शिक्षण मारळ व आंगवली हायस्कूल येथे, बारावीपर्यंतचे शिक्षण आठल्ये - सपे्र - पित्रे महाविद्यालय, देवरुखमध्ये, तर नंतर डी. एड. पुणे येथे झाले आहे. सागरची हॉकीसाठीची सुरुवात १९ वर्षांखालील वयोगटातून झाली. जिल्हा विभागातून राज्य पातळीवर निवड झाली होती. यावेळी सातारा येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर खुल्या गटातून परभणी येथे राज्य अजिंक्यपदासाठी निवड, याबरोबरच अमरावती येथे राष्ट्रीय निवड चाचणीसाठी तो सहभागी झाला होता. त्याचे प्रशिक्षक निखील सुनील कोळवणकर हे बोलताना म्हणाले की, सागरची कारकिर्द आऊटडोअरकडून इनडोअर अशी झाली आहे. सागर हा हॉकी खेळाच्या सरावासाठी मारळहून देवरुखमध्ये सकाळी ६ वाजता येत असे, त्याच्यातील गुणवत्ता ओळखून त्याला योग्य दिशा दिली, असे ते म्हणाले.
सागर हा महाराष्ट्राचा हॉकी संघाचा गोलकिपर आहे. त्याची आष्टा येथील डांगे पब्लिक स्कूलमध्ये हॉकी कोच म्हणून नियुक्ती झाली होती, तर आता त्याची पेनांग मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सागरला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सांगलीचे पांगम, खातीक, देवरुखमधील त्याचे प्रशिक्षक व महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनचे सदस्य निखिल कोळवणकर, डॉ. राजकुमार इंगळे, विनोद पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. सुनील लिंगायत, मारळचे सरपंच विनायक सावंत, प्रसाद सावंत, नंदकुमार सावंत, समीर आंबेकर यांनी त्याचे अभिनंदन केले. (वार्ताहर)
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमच्या जोरावर सागर याने राष्ट्रीयस्तरापर्यंत धडक मारली आहे. त्याला लहानपणापासूनच हॉकीची आवड होती. त्यामुळे त्याने या खेळाची कास धरली आणि शेवटपर्यंत तो अपयशाचे खचून गेला नाही तर नव्याने उभा राहिला. त्यामुळेच त्याने एवढ्या पातळीपर्यंत मजल मारली आहे. त्याने या राष्ट्रीयस्तरावरही चांगली कामगिरी करावी आणि कुटुंबाचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचेही नाव उज्ज्वल करावे.
- शांताराम तुकाराम पवार,
(सागरचे वडील)