दाट धुके व हिरवाईने पोखरीच्या सौंदर्यात भर

By Admin | Updated: August 25, 2016 01:50 IST2016-08-25T01:50:03+5:302016-08-25T01:50:03+5:30

आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग पर्यटकांना भुरळ घालीत आहे.

Dense fog and green fodder beauty fill in | दाट धुके व हिरवाईने पोखरीच्या सौंदर्यात भर

दाट धुके व हिरवाईने पोखरीच्या सौंदर्यात भर

कांताराम भवारी,

डिंभे- आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग पर्यटकांना भुरळ घालीत आहे. एकीकडे पर्यटनाबरोबरच देशभरात प्रसिद्ध असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर, तर दुसरीकडे आहुपेचा निसर्ग व येथील कोकणेकडे पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. या सर्व ठिकाणचा आनंद घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपणाला जावे लागते पोखरी घाटात.
या घाटाची सफर करूनच पुढे जावे लागते. अलीकडे या घाटातील सौंदर्यही पर्यटकांना खुणावू लागले आहे. घाटातून दिसणारे डिंभे धरण, गोहे पाझर तलावाचे नयनरम्य चित्र, परिसरातील आदिवासींची टुमदार घरे व येथील भातशेतीमुळे हा परिसर सध्या हिरवाईने नटला आहे. त्यातच सकाळी घाटात पडणाऱ्या दाट धुक्यामुळे या भागातील चित्र पालटले असून, बदलू लागलेले पोखरी घाटाचे चित्र पर्यटकांच्या मनाला भुरळ घालू लागले आहे.
आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग तसा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर आहे. सर्व परिसर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा प्रदेश असल्याने पावसाळा सुरू होताच या भागात लहान-मोठे धबधबे सुरू होतात. त्यातच एकीकडे देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकरचे व दुसरीकडे आंबेगाव तालुक्याचे असणारे शेवटचे टोक आहुपे. येथील वनराई व कोकणकडे यामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला निसर्गसौंदर्याचा वारसाच लाभला आहे. एरवी उन्हाळ्यामध्ये सर्वत्र रखरखीत दिसणारा हा प्रदेश पावसाळा सुरू होताच हिरवाईची शाल पांघरतो. हिरवाईने नटलेले उंचच्या उंच डोंगर व खळाळणारे धबधबे पर्यटकांना या भागात येण्यासाठी मोहित करतातच. त्यातच तुडुंब भरलेले डिंभे धरणाचे पाणलोटक्षेत्र येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत नसेल तरच नवल!
या सर्वांचा आनंद लुटायचा असेल तर आपणास पहिल्यांदा जावे लागते ते पोखरी घाटात. हा सातमाळीचा घाट चढल्यावरच आपणास भीमाशंकर खोऱ्यातील पर्यटनाचा खरा आनंद उपभोगता येतो. मात्र, सध्या या घाटातील सौंदर्यानेच पर्यटकांच्या मनाला भुरळ घातल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आदिवासी भागाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या डिंभे गावच्या पुढे निघाल्यावर डाव्या बाजूला रस्ता वळतो. तो जातो श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे. तर उजव्या बाजूचा रस्ता जातो डिंभे धरणाला वळसा घालीत फुलवडे, बोरघर, आडिवरे, माळीणपासून आहुपे या दुर्गम भागातील खेड्यांकडे. डाव्या बाजूकडील रस्त्याने साधारणत: दोन किमीवर गेल्यावर सुरू होतो तो पोखरी घाट. याला सातमाळीचा घाट असेही नाव आहे. वेडीवाकडी वळणे घेत चढाई सुरू करताच पहिल्या वळणावर कोसळणारा धबधबा पाहून भिजण्याचा मोह न होईल तरच नवल. येथील धबधबा पाहताच आपसूकच आपले बे्रकवरील पाय दाबले जातात. येथून पुढे जाताच आपणास उजव्या बाजूस दिसतो तो इंग्रजी व्ही आकाराचा गोहे पाझरतलाव. या तलावाने घाटातील सौंदर्यात मोलाची भर घातली आहे.

Web Title: Dense fog and green fodder beauty fill in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.