डेंग्यूचे थैमान; प्रशासन मात्र सुस्तच
By Admin | Updated: November 9, 2014 00:48 IST2014-11-09T00:48:16+5:302014-11-09T00:48:16+5:30
शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती.

डेंग्यूचे थैमान; प्रशासन मात्र सुस्तच
महापालिका : ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले ?
नागपूर : शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती. परंतु प्रशासन अद्याप सुस्तच असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
शासकीय व खासगी रुग्णालयात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची गर्दी वाढल्याने अनेक खासगी रुग्णालयांनी वसुलीला सुरुवात केली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेचा हा खर्च आहे. क्षमता नसतानाही जीवाला धोका नको म्हणून नाईलाजाने रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे डेग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना केल्याचा दावा मनपातील पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. शहरातील अनेक वस्त्यात अस्वच्छता आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने शहरात सर्वत्र डासांचा प्रकोप वाढला आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले, असा प्रश्न लोकांना पडला आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी अशा वस्त्यांत फेरफटका मारला तर वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास येईल. नागरिकांची अशी संतप्त प्रतिक्रिया आहे. डास नियंत्रणासाठी औषध फवारणी सुरू असल्याचा दावा केला जात आहेत. परंतु प्रत्यक्षात अनेक वस्त्यात मागील काही महिन्यात औषध फवारणी करणारे फिरकलेले नाही. डेंग्यू नियंत्रणासंदर्भात दररोज झोननिहाय माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कागदोपत्री आकडेवारी गोळा करून अहवाल तयार केला जातो. अशी धक्कादायक माहिती आहे. ज्या वस्त्यात आरोग्य विभागाचे पथक फिरकले नाही. (प्रतिनिधी)