अकोला जिल्ह्यात दोघांचा डेंग्यूने मृत्यू
By Admin | Updated: October 12, 2014 00:46 IST2014-10-12T00:31:11+5:302014-10-12T00:46:33+5:30
एकाला डेंग्यू तर दुस-याला डेंग्यूसदृश्य ताप

अकोला जिल्ह्यात दोघांचा डेंग्यूने मृत्यू
अकोला : डेंग्यमुळे जिल्ह्यातील कट्यार येथील एक ४0 वर्षीय महिला व ६0 वर्षीय इसमाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. अस्वच्छता, पाण्याच्या डबक्यांमध्ये होणारी डासांची उत्पत्ती, यामुळे जिल्हय़ात डेंग्यूसदृश आजारांचे थैमान माजले असताना, दोघांचा डेंग्यूने बळी घेतल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हय़ात साथरोगांसोबतच टायफाईड, डेंग्यूसदृश तापाची साथ असून, व्हायरलने अनेकांना हैराण केले आहे. रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. जिल्हय़ात आतापर्यंंत जवळपास १२ जणांचा डेंग्यू व डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे. कट्यार येथील राजाराम विठ्ठल सोळंके (६0) यांचा शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गुरुवारी मृत्यू झाला. सोळंके यांचा मृत्यू डेंग्यूसदृश्य आजाराने झाल्याचे येथील डॉक्टरांनी अहवाल दिला आहे. यासोबतच याच गावातील सविता राजेंद्र ढोरे (४0) ही तापाने आजारी होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जिल्हय़ात डेंग्यूसदृश ताप आणि टायफाईडच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या रुग्णांवर नेमका कशाप्रकारे औषधोपचार करावा, याबाबत डॉक्टरही गोंधळात सापडले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छतेकडे कानाडोळा केल्यामुळेही साथीच्या तापाचा उद्रेक होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा आजार डेंग्यूसदृश्य असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. उन्हामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना लवकर प्रादुर्भाव होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरासह जिल्हय़ातील ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा प्रकोप झाला आहे. गत एक महिन्यापासून रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सवरेपचार रुग्णालयामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू असून, खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची प्रचंड गर्दी आहे.