वेगळ्या विदर्भासाठी गडकरींच्या वाड्यापुढे निदर्शने
By Admin | Updated: August 3, 2014 00:59 IST2014-08-03T00:59:18+5:302014-08-03T00:59:18+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी. तसेच महाराष्ट्रासोबतच विदर्भ राज्याच्याही निवडणुका घ्याव्या, अशी मागणी क रीत विदर्भ राज्य आंदोलन

वेगळ्या विदर्भासाठी गडकरींच्या वाड्यापुढे निदर्शने
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन : आता आश्वासनाची पूर्तता करा
नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी. तसेच महाराष्ट्रासोबतच विदर्भ राज्याच्याही निवडणुका घ्याव्या, अशी मागणी क रीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यानी शनिवारी मोर्चा काढून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यापुढे निदर्शने केली.
विदर्भाची मागणी जुनी आहे. यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली. विदर्भ हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते, अशी शिफारस वेगवेगळ्या आयोगांनी केंद्र शासनाकडे केली आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तीन नवीन राज्यांची निर्मिती करण्यात आली. भाजपच्या जाहीरनाम्यातसुद्धा लहान राज्यांना पाठिंबा दर्शविला आहे. एवढेच नव्हेतर भुवनेश्वर येथील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतही विदर्भासंदर्भात सकारात्मक भूमिका होती.
केंद्रात सत्ता आली तर विदर्भ राज्य देण्याचे अभिवचन भाजप नेत्यांनी दिले होते. आता त्यांनी आश्वासन पूर्ण करावे . यासाठी समितीचे राम नेवले, अरुण केदार, डॉ. सुनील बजाज, अॅड. नंदा पराते, वसंतराव कांबळे, अरुण वनकर, प्रवीण महाजन, मुरलीधर ठाकरे, राम आकरे, दिलीप नरवडिया, जनमंचचे चंद्रकांत वानखेडे, अॅड. अनिल किलोर, शरद पाटील आदींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
वैदर्भीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विदर्भाच्या मागणीसाठी दबाव आणावा, यासाठी नागपूरसह विदर्भातील ठिकठिकाणी खासदारांच्या निवासापुढे शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती नेवले यांनी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भाची निर्मिती झाली नाही तर यासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आंदोलनात अण्णाजी पांडुरंग सावराजेधर, इंजिनिअर धर्मराज रेवतकर, श्याम वाघ, राजेंद्र तिजारे, अशोक सरस्वती याच्यासह विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
पोलिसांसोबत धक्काबुक्की
पोलिसांनी आंदोलकांना महाल चौकात अडविण्याचा प्रयत्न केला. मार्गात कठडे लावले होते. परंतु आंदोलकांनी न जुमानता गडकरी यांच्या वाड्याकडे धाव घेतली. यावेळी पोलीस व आंदोलकात धक्काबुक्की झाली. परंतु हा वाद लगेच शमला. आंदोलन शांततेत पार पडले.