जातीच्या भिंती तोडून घडले माणुसकीचे दर्शन

By Admin | Updated: March 31, 2015 00:26 IST2015-03-30T20:35:04+5:302015-03-31T00:26:00+5:30

हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती : कुरूंदवाड येथील बागवान कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात

Demonstrate breeding walls and exhibit humanity | जातीच्या भिंती तोडून घडले माणुसकीचे दर्शन

जातीच्या भिंती तोडून घडले माणुसकीचे दर्शन

गणपती कोळी -कुरुंदवाड --‘जिसका कोई नहीं होता, उसका खुदा होता हैं’ याचा प्रत्यय कुरुंदवाडवासीयांनी दाखवून दिला. येथील ढेपणपूर वसाहतीत पती-पत्नीवर खुनीहल्ला झाला. यामध्ये दस्तगीर अल्लाबक्ष बागवान मृत झाले, तर पत्नी परवीन बागवान रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. बागवान दाम्पत्याला चार लहान मुले असून, मुलांना आई मिळवून देण्यासाठी शहरवासीयांनी जातिभेदाच्या भिंती तोडून हजारो रुपयांचा मदतीचा हात दिला आहे. या मदतीतून माणुसकीचे दर्शन तर घडले आहेच, शिवाय हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेल्या या शहराने ऐक्याची मूठ आणखी घट्ट केली आहे. चार दिवसांपूर्वी येथील ढेपणपूर वसाहतीमध्ये दिलीप माळी या तरुणाने किरकोळ कारणावरून दस्तगीर बागवान (वय ३५) व परवीन बागवान (३०) या दाम्पत्यावर कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले. उपचार सुरू असताना दस्तगीर यांचा मृत्यू झाला, तर परवीन अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र, या हल्ल्यातून हिंदू-मुस्लिम ऐक्याला तडा जाऊन वाद पेटण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस यंत्रणा सतर्क झाली. जलद कृती दलासह मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला. मात्र, वाद तर नाहीच, या दाम्पत्याला आकसा (१४), अंजलना (९), अलसिबा (७) या तीन मुली व महंमदअतीफ (३) हा मुलगा, अशी चार मुले आहेत. खुनी हल्ल्यातून मुले बापाला मुकली, किमान आईतरी मिळू दे, म्हणून सर्वच समाजातील लोक एकत्रित येऊन मदतीचा हात देत आहेत. त्यामुळे पोलीसही अवाक् झाले असून, या हिंदू-मुस्लिम ऐक्यालाच सलाम करीत आहेत.


मदतीचा हात
परवीन बागवान अद्यापही गंभीर अवस्थेत असून, त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासाठी मोठा आर्थिक खर्च येणार असल्याने उपचारासाठी व मुलांच्या खर्चासाठी पालिका सभागृहात सर्व जातीधर्माची बैठक बोलाविण्यात आली होती. प्रत्येक समाजातील व्यक्तीने घटना दुर्दैवी म्हणून उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात दिला, तर अनेकांनी लहान मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली.


पोलिसांची बांधीलकी
हिंदू-मुस्लिम वाद होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र, शहरवासीयांनी पोलिसांची शक्यता पिटाळत ऐक्याचे दर्शन घडवून दिल्याने पोलीस अधिकारीही थक्क झाले. त्यामुळे बागवान यांच्या उपचारासाठी पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनीही दहा हजारांची आर्थिक मदत देऊन ऐक्यात सहभाग घेतला.

शहर एकवटले
दस्तगीर बागवान यांना
शेतीवाडी नसून राहावयास
घरही नाही. भाड्याच्या
लहानशा खोलीत राहून ते येथील मार्केटमध्ये हमाली करून संसाराचा उदरनिर्वाह करीत होते. प्रत्येकाशी आदराने वागणाऱ्या या तरुणावर काळाने घाला घातल्याने त्यांच्यासाठी शहरच एकवटले आहे.

Web Title: Demonstrate breeding walls and exhibit humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.