दानवे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष
By Admin | Updated: January 3, 2015 02:49 IST2015-01-03T02:49:34+5:302015-01-03T02:49:34+5:30
केंद्र सरकारमधील अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय पक्का झाला

दानवे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष
निर्णय पक्का : भाजपाध्यक्ष अमित शहा यांची दानवेंना पसंती
मुंबई : केंद्र सरकारमधील अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय पक्का झाला असून तसे संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी बैठकीत दिले. प्रदेशाध्यक्षपद दानवे यांच्याऐवजी सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर या तरुणाकडे जावे, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता. मात्र दानवे यांच्या नावाला शहा यांनी पसंती दिल्याचे समजते.
मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेले दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होऊन विद्यमान प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. ‘एक व्यक्ति एक पद’ या सुत्रानुसार प्रदेशाध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता.
प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पण पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे दानवे यांच्याकडे ही जबाबदारी सुपूर्द करण्याचा निर्णय झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दानवे
यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. विदर्भाकडे मुख्यमंत्री पद तर मराठवाड्याकडे प्रदेशाध्यक्ष पद देऊन भाजपाने प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाड्याकडे दुसऱ्यांदा हे पद आले
आहे. (विशेष प्रतिनिधी)
प्रदेशाध्यक्षपदासाठी मोदी सरकारमधील राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त लोकमतने २ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. हे वृत्त शुक्रवारी तंतोतंत खरे ठरले.