वसई परिवहन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे जोरदार भीक मांगो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 03:16 IST2016-08-01T03:16:04+5:302016-08-01T03:16:04+5:30
प्रवाशांना अतिशय वाईट सेवा देत असल्याने तो तात्काळ बदलावा आणि ती सुस्थितीत येत नाही तोपर्यंत दरवाढ मागे घेण्यात यावी

वसई परिवहन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे जोरदार भीक मांगो
विरार : वसई विरार महापालिकेचा ठेकेदार स्वत:च्या फायद्याचा विचार करून प्रवाशांना अतिशय वाईट सेवा देत असल्याने तो तात्काळ बदलावा आणि ती सुस्थितीत येत नाही तोपर्यंत दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
परिवहन सेवेच्या दरवाढीविरोधात रविवारी संध्याकाळी नालासोपारा शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार आनंद ठाकूर यांनी ही मागणी केली. परिवहन सेवेचा ठेकेदार राज्य सरकार, महानगरपालिका आणि प्रवाशांची फसवणूक करीत आहे.
ठेकेदार हा जुनाट, कालबाह्य , नादुरुस्त बसेस चालवत आहे. अनेक बसेस धूर ओकत असून प्रदूषण करीत असतात. बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. वाहक आणि चालक प्रवाशांशी उद्धटपणे वागत असतात, अशा अनेक तक्रारींचा पाढा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंंदा गुंजाळकर यांनी यावेळी वाचला.
ठेकदाराकडून करारनाम्यातील अनेक अटी आणि शर्तींचा भंग झाला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी ठेकेदार मनमानी करीत आहे. म्हणून हा ठेका रद्द करून नवा ठेकेदार नेमण्यात यावा किंवा पालिकेने स्वत: सेवा चालवावी अशी जोरदार मागणी आमदार आनंद ठाकूर यांनी यावेळी केली.
(प्रतिनिधी)