मला हटवा !
By Admin | Updated: March 21, 2015 00:43 IST2015-03-21T00:42:41+5:302015-03-21T00:43:23+5:30
७२ नगरसेवक एकवटले : महापौरांचे स्वत:विरोधात मतदान

मला हटवा !
कोल्हापूर : काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘लाचखोर महापौरांनी राजीनामा द्यावा’, अशी जोरदार मागणी करत निषेधाचे फलक गळ्यात अडकवूनच सर्वसाधारण सभेत प्रवेश केला. मतदानासाठी बजावलेल्या पक्षादेशामुळे (व्हीप) संभावित कारवाईच्या भीतीने सभागृहात उपस्थित सर्वच ७२ नगरसेवकांसह महापौर माळवी यांनीही नगरसेवकपद रद्द करण्याच्या ठरावाच्या बाजूने मतदान करत ठरावास संमती दिली. तृप्ती माळवी यांनी महापौरपदाचा आधार घेत लाच स्वीकारल्यामुळे महापौरपदाचे नैतिक अध:पतन झाले आहे. पदाचा गैरवापर केल्याच्या कारणास्तव त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस प्रशासनाने राज्य शासनाकडे करावी, असे दोन ठराव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत झाले होते. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १३ (१) (अ) व (ब) तसेच कलम १० (१-१अ) मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला होता. दरम्यान, न्यायालयाने असा ठराव सभागृहात करण्यास काहीच हरकत नाही, असा निर्वाळा दिल्याची माहिती महापालिकेच्या विधितज्ज्ञांनी दिली. ‘न्याय देवतेचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा देत, याचे सत्ताधारी नगरसेवकांनी बाके वाजवून स्वागत केले.त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, गटनते शारंगधर देशमुख व राजेश लाटकर यांनी महापौरविरोधातील ठरावाच्या विरोधी भूमिका किंवा मतदान करणाऱ्यांना पक्षविरोधी कारवाईनुसार नगरसेवकपद सोडावे लागेल, अशी माहिती दिली. त्यानंतर शिवसेना-भाजप आघाडीचे प्रमुख संभाजी जाधव व ‘जनसुराज्य’चे विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव यांनी आघाडीच्या सदस्यांना पक्षादेशानुसार ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. मनपा कायद्यानुसार अशा ठरावावेळी संबंधिताला म्हणणे मांडण्याची संधी आहे, ती संधी महापौरांना द्यावी, याचा सभावृत्तांत समावेश करावा, अशी सूचना राजेश लाटकर यांनी मांडली. मात्र, महापौरांनी म्हणणे न मांडताच मतदान घेण्यास अनुमती दिली. त्यानंतर मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक व परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांच्या नियंत्रणाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. सभागृहात एकूण ८२ सदस्यांपैकी ७७ सदस्य उपस्थित होते. पाच स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे महापौरांसह सर्व उपस्थित ७२ नगरसेवकांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी जोरदार बाके वाजवून आनंद व्यक्त केला. ‘लाचखोर प्रवृत्ती हद्दपार करा’, ‘कोल्हापूरची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
हा ठराव विनाविलंब शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. मतदानानंतर झालेल्या भाषणात नगरसेवकांनी पक्षीय राजकारणाचे उट्टे काढल्याने एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत तणावाच्या वातावरणातच सभेचे कामकाज पूर्ण झाले.
(प्रतिनिधी)
महापौरांची हतबलता
पक्षाने मतदानासाठी लेखी किंवा सभागृहात गटनेत्यांनी आदेश (व्हीप) बजावल्यानंतर तो संबंधित पक्ष किंवा आघाडीच्या सदस्यांनी पाळणे बंधनकारक असते. पक्षाने आणलेल्या ठरावाविरोधात इच्छा असूनही सदस्यांना बोलता किंवा मतदान करण्याचा अधिकार राहत नाही.
पक्षादेश झुगारून मतदान केल्यास संबंधित सदस्याचे पद रद्द करण्याबाबत कारवाई करण्याचा अधिकार पक्षास आहे. असा पक्षादेश डावलल्याने अनेकजणांना नगरसेवक पदावर पाणी सोडावे
लागले आहे.
महापौैर माळवी यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने अजूनही निलंबनाची कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्या पक्षाच्या सदस्य नगरसेविका आहेत. त्यांनाही पक्षाने व्हीप बजावला होता. त्यामुळे नाईलाजाने महापौरांना आपल्याच विरोधातील ठरावास हात वर करून संमती देण्याची हतबलता सहन करावी लागली.
हे नगरसेवक अनुपस्थित
महापौर विरोधातील ठरावावेळी सभागृहात सर्जेराव पाटील, निशिकांत मेथे, मृदुला पुरेकर, दिगंबर फराकटे, पल्लवी देसाई हे पाच नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार, याबाबत उत्सुकता आहे.
लाचखोर प्रकरणात कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरविले नसल्याने ठरावाचा काहीही उपयोग होणार नाही. मतदानासाठी राष्ट्रवादी पक्षाने मलाही ‘व्हीप’ बजावला. याचा अर्थ अजूनही राष्ट्रवादीत आहे. राज्य शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या ठरावाविरोधात न्यायालयात दाद मागणार.
- महापौर तृप्ती माळवी