प्राइम टाइमची व्याख्या बदलत फडणवीस सरकारचा मध्यममार्गी तोडगा
By Admin | Updated: April 10, 2015 09:09 IST2015-04-09T17:33:30+5:302015-04-10T09:09:01+5:30
फडणवीस सरकारने प्राइम टाइमची वेळ दुपारी 12 ते रात्री 9 अशी असल्याची व्याख्या स्पष्ट केली आणि या सगळ्या वादामध्ये मध्यममार्गी तोडगा काढला.

प्राइम टाइमची व्याख्या बदलत फडणवीस सरकारचा मध्यममार्गी तोडगा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - मराठी सिनेमांना प्राइम टाइममध्ये दाखवण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जबरदस्त टीका झाल्यानंतर प्राइम टीमची व्याख्याच बदलून फडणवीस सरकारने काही प्रमाणात आपली लाज राखली आहे. आधी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मल्टिप्लेक्समध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेमध्ये मराठी सिनेमा दाखवलाच पाहिजे अशी सक्ती केली होती.
मात्र, शोभा डेंसह आमिर खानसारख्या अनेक दिग्गजांनी एकतर्फी अशी सक्ती करण्याबाबत टीका केली होती. तसेच सोशल मीडियावरही फडणवीसांची भूमिका हुकूमशहासारखी आहे का असा प्रश्न विचारला जायला लागला होता. या सगळ्या घडामोडींनंतर फडणवीस सरकारने प्राइम टाइमची वेळ दुपारी 12 ते रात्री 9 अशी असल्याची व्याख्या स्पष्ट केली आणि या सगळ्या वादामध्ये मध्यममार्गी तोडगा काढला.
त्यामुळे आता मल्टिप्लेक्समध्ये किमान एका स्क्रीनवर दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेमध्ये कधीही एक तरी शो मराठी सिनेमाचा दाखवावा लागणार आहे. यामुळे मराठीचा घोडा दामटल्याचे समाधान सरकारला मिळेल तसेच ऐन कमाईच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेत हिंदी वा इंग्रजी सिनेमे दाखवून गल्ला भरण्याचा मार्ग मल्टिप्लेक्स मालकांसाठी मोकळा राहील असे स्पष्ट झाले आहे.