कर्जमाफीची आकडेवारी फसवी - काँग्रेसचा आरोप
By Admin | Updated: July 5, 2017 04:46 IST2017-07-05T04:46:09+5:302017-07-05T04:46:09+5:30
शेतकरी कर्जमाफी संदर्भात सातत्याने अतिरंजीत आकडेवारी देऊन सरकार राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. १० हजाराची

कर्जमाफीची आकडेवारी फसवी - काँग्रेसचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्र्क
मुंबई : शेतकरी कर्जमाफी संदर्भात सातत्याने अतिरंजीत आकडेवारी देऊन सरकार राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. १० हजाराची उचल देण्याच्या योजनेचा फायदा फक्त १०८२ शेतकऱ्यांनाच मिळाला, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
संपूर्ण कर्जमाफी ३४ हजार कोटींची नसून फक्त ५ हजार कोटींचे आहे. तसेच ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून केवळ १५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मागील दहा ते १२ वर्षाची आकडेवारी दाखवून प्रत्यक्ष कर्जमाफीचा कार्यकाळ फक्त चार वर्षांचा ठेवायचा असा उद्योग उद्योग शासनाने केला आहे, असा आरोप करुन सावंत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फक्त ३६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यातही या ३६ लाख शेतकऱ्यांमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश पाहून राज्य शासन किती धादांत असत्य बोलत आहे हे स्पष्ट झाले आहे. मुंबई शहरात शेतजमीनच नाही तर शेतकरी कुठून आले? असा सवाल सावंत यांनी केला. एकूण कर्जदार शेतकऱ्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांनी दिलेली संख्या जास्त असल्याचे सावंत म्हणाले.