दंगलखोरांवर कडक कारवाई करणार - दीपक केसरकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:46 AM2018-01-03T02:46:50+5:302018-01-03T02:47:05+5:30

 Deepak Kesarkar will take strong action against rioters | दंगलखोरांवर कडक कारवाई करणार - दीपक केसरकर  

दंगलखोरांवर कडक कारवाई करणार - दीपक केसरकर  

Next

कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून दिली जाईल, असे अश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
केसरकर यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे, कायदा-सुव्यवस्थेचे महासंचालक बिपीन शर्मा, पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते. या वेळी केसरकर यांनी पेरणे फाटा येथील विजय स्तंभ, वढु बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधीस्थळ व गोविंद गोपाळ यांच्या स्मारकाची पाहणी केल्यानंतर कोरेगाव, सणसवाडी व शिक्रापूर यथील नुकसानाचीही धावती पाहणी केली.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी पोलिसांनी कालची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असून, बफर झोन तयार करून दोन गटांमधील अंतर कायम ठेवले. पोलिसांवरच दगडफेक होत असताना त्यांनी संयम ठेवून फक्त अश्रुधूर व लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असा दावा केला.
पूर्वकल्पना असतानाही घटनास्थळी पोलीस बळ कमी पडले का? असा सवाल पत्रकारांनी केला असता, वढूतील झालेली घटना सामंजस्याने मिटविली होती. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल, असे वाटत नव्हते. काढण्यात आलेली रॅलीही पूर्वनियोजित नव्हती. दोन रॅली समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होऊन हा तणाव निर्माण झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याची गरज आहे, तर यापुढील काळामध्ये अशा प्रकरच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
दंगलीमध्ये ठार झालेल्या राहुल बाबाजी फटांगडे (वय ३०, रा. साईनाथनगर डोंगरवस्ती, सणसवाडी) व इतर जखमींना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. इतर नुकसानाचा विमा नसला तरी मदत मिळवून देऊ, त्याचप्रमाणे यापुढे स्तंभ परिसरात येणाºया जनसमुदयाबाबत शासनाकडुून योग्य ती खबरदारी घेऊ असे त्यांनी सांगितले.

पोलीस अकार्यक्षम असल्यानेच दुर्घटना

कोरेगाव भीमाची दुर्घटना दुर्दैवी असून पोलीस प्रशासन अकार्यक्षम राहिल्याने व परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्यानेच घटना घडल्याची टीका खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली आहे. लोकसभेत उद्या कोरेगाव भीमा दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगून त्यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन या वेळी केले.

तरीही कमी बंदोबस्त

यावेळी बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले की,‘ वढु बुद्रुक येथे झालेली घटनेबाबात पोलीस यंत्रणेला एक महिन्यापूर्वीच कल्पना दिली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नाही. पूर्वकल्पना असतानाही कोरेगाव भीमाला कमी पोलीस बंदांबस्त ठेवला. या घटनेत अनेकांचे उपजिविकेचे साधनच नष्ट झाले असल्याने प्रशासनाला योग्य पध्दतीने पंचनामे करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार अशोक पवार यांनीही योग्य ती खबरदारी न घेतल्याने व परिस्थिती हाताळताना लोकप्रतिनीधींना विश्वासात न घेतल्याने घटना घडली असल्याचे सांगितले.

केसरकरांनी पाठ फिरवताच पुन्हा गोंधळ

केसरकर येथून भेट देत शिक्रापूर कडे जाताच कोरेगाव भीमा येथे महामार्गावर जमा झालेल्या जमावाने काही दुकानांची जाळपोळ केल्याने गोंधळ निर्माण झाला.

पोलिसांनी घेतली बघ्याची भुमिका
पोलिसांसमोर जमाव स्थानीकांची वाहने, दुकाने जाळीत असतानाही पोलीस बघ्याची भुमिका घेत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर पोलीसंनी कारण नसताना केवळ घरावर शिवरायांचा पुतळा असल्याने तोडफोड केल्याचीही तक्रार नागरिक करित होते.

पंचनाम्यासाठी एसआयटी टीम
कोरेगाव भीमा येथील नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. पंचनामे केले जातील व भरपाई मिळवून देण्यावर भर दिला
जाईल. घटनेवेळीचे सीसीटीव्ही फुटेज
मिळविले असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिले.
 

Web Title:  Deepak Kesarkar will take strong action against rioters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.