राणेंविरुद्ध ५ कोटींचा दावा करणार - दीपक केसरकर

By Admin | Updated: July 21, 2014 02:51 IST2014-07-21T02:51:01+5:302014-07-21T02:51:01+5:30

कोकणातील जनता आता पाठीशी उभी राहत नसल्याने काँग्रेस नेते व उद्योगमंत्री नारायण राणे सध्या बिथरले असून माझी व माझ्या कुटुंबियांची बदनामी चालविली आहे.

Deepak Kesarkar to claim Rs 5 crore against Rane | राणेंविरुद्ध ५ कोटींचा दावा करणार - दीपक केसरकर

राणेंविरुद्ध ५ कोटींचा दावा करणार - दीपक केसरकर

मुंबई : कोकणातील जनता आता पाठीशी उभी राहत नसल्याने काँग्रेस नेते व उद्योगमंत्री नारायण राणे सध्या बिथरले असून माझी व माझ्या कुटुंबियांची बदनामी चालविली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच राणे यांनी ही बेताल वक्तव्ये थांबवावीत अन्यथा त्यांचे काळे धंदे जनतेसमोर उघड करावी लागतील, असा सूचक इशाराही केसरकरांनी दिला.
राणे यांची भाषा घसरत चालली असून ते गुंडगिरीची भाषा वापरत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राणेंनी दहशतीच्या जोरावर इतरांना संपविण्याचा प्रयत्न केला, पण तेच संपले. त्यांच्यामागे कुणी राहिलेलेच नाही, त्यामुळेच त्यांना माझी भीती वाटते आणि त्यातूनच माझ्यावर आरोप करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
आज राणे मंत्रीपद सोडताहेत उद्या ते विधानसभेत दिसणार नाहीत, याची काळजी कोकणातील जनता घेईल. राणेंचे आव्हान मी स्वीकारले असून मतपेटीतून चोख प्रत्युत्तर देऊ, असा निर्धार केसरकर यांनी व्यक्त केला.
माझ्यावर असंस्कृत आणि कृतघ्नपणाचा आरोप करणाऱ्या राणेंनी आधी आपला इतिहास तपासावा. सुसंस्कृत म्हणविणाऱ्या राणेंना कोकणवासीयांनी का नाकारले, सावंतवाडीतून तब्बल ४२ हजार मतांनी राणेपुत्र पिछाडीवर का, या प्रश्नांचा त्यांनी विचार करावा. राणे पितापुत्रांनी कोकणाला न्याय दिला नाही, तर कोकणच्या विकासाची अडवणूक केली, असा आरोप केसरकर यांनी केला. राणे यांच्याकडून जीवाला धोका आहे. याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे यापूर्वीच तक्रार दिली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडेही याबाबत तक्रार केली. राज्याच्या राजकारणातून ही गुन्हेगारी संपायलाच हवी, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Deepak Kesarkar to claim Rs 5 crore against Rane