जिल्हा परिषदेच्या तळा येथील उर्दू शाळेतील पटसंख्येत घट
By Admin | Updated: June 29, 2016 02:46 IST2016-06-29T02:46:51+5:302016-06-29T02:46:51+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या तळा उर्दू शाळेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्हा परिषदेच्या तळा येथील उर्दू शाळेतील पटसंख्येत घट
तळा : रायगड जिल्हा परिषदेच्या तळा उर्दू शाळेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. १२५ विद्यार्थी संख्या असणाऱ्या तळा शाळेत दोनच शिक्षक आहेत. मात्र या उलट शाळेतून ७-८ विद्यार्थी संख्या आहे आणि तेथेही दोन शिक्षक काम करीत आहेत. शिक्षण विभागाच्या ढिसाळपणाचा त्रास विद्यार्थ्यांना होत असून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही.
अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषय शिकविला जात आहे. येथे मात्र तसे घडताना दिसत नाही. शाळेत इंग्रजी शिकविले जाते की नाही हे पाहण्यासाठी अधिकारीवर्गाला वेळ मिळत नाही. अशा अनेक कारणांमुळे पालकवर्ग नाराज झाला असून आपल्या पाल्याला उर्दू प्राथमिक शाळेतून काढून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत ४ वर्ग असून १२५ विद्यार्थी संख्या आहे. येथे दोनच शिक्षक कार्यरत आहेत. अजून दोन शिक्षकांची आवश्यकता आहे, ते शासनाने अर्थात शिक्षण विभागने द्यावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दिवसेंदिवस प्राथमिक शिक्षणाची परिस्थिती गंभीर होत असताना ती बदलली गेली पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते महमद परदेशी यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)
शिक्षकांनी लक्ष द्यावे
पालकांची आणि विद्यार्थ्यांची मानसिकता बदलून या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाणार नाहीत, याकडे असणाऱ्या शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे. त्यांना या कृतीपासून परावृत्त केले पाहिजे असे पालकांचे म्हणणे आहे.
दिवसेंदिवस प्राथमिक शिक्षणाची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देवून ती बदलणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ महमद परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.