‘सनातन’ला देशद्रोही घोषित करा
By Admin | Updated: September 19, 2015 00:41 IST2015-09-19T00:36:07+5:302015-09-19T00:41:06+5:30
बंदीही घाला : शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीची मागणी

‘सनातन’ला देशद्रोही घोषित करा
कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी अटक केलेला समीर गायकवाड हा संशयित आरोपी ‘सनातन’ संस्थेचा साधक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या संस्थेला देशद्रोही संघटना म्हणून घोषित करून बंदी आणावी, अशी मागणी शुक्रवारी शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत राज्य शासनाला कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्मिता पानसरे यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली.
यावेळी सतीशचंद्र कांबळे म्हणाले, सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले आहेत. त्याचबरोबर ‘सनातन’च्या लिखाणाची पद्धत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विरोधी आहे.
चंद्रकांत यादव म्हणाले, ‘सनातन’चे काम हे संविधानविरोधी असून, ते लोकशाहीसाठी मारक आहे. त्यामुळे या संस्थेवर बंदी घातली पाहिजे. यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन या संदर्भात विधिमंडळ सभागृहात प्रश्न मांडण्याची मागणी करू.
नामदेव गावडे म्हणाले, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
गिरीष फोंडे म्हणाले, ‘सनातन’ला देशद्रोही घोषित करून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात या संस्थेच्या पुस्तक स्टॉल्सवर बंदी घालावी.
निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्मिता पानसरे म्हणाल्या, आतापर्यंत आम्ही सनातन संस्थेबाबत आक्षेप घेत होतो. परंतु, आता पोलीस प्रशासनाने या संस्थेच्या कार्यकर्त्यालाच अटक केल्याने ते स्पष्ट झाले आहे. या संस्थेचा कारभार हा काही मूठभर हिंदंूचे हित साधणारा आहे. धर्मभोळ्या व देवभोळ्या हिंदू समाजातील लोकांची माथी भडकाविण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. बहुजनांचे केवळ धड असून, माथी ही दुसऱ्याचीच आहेत. परंतु, येथून पुढील काळात बहुजनांच्या धडावर बहुजनांचीच डोकी राहतील, यासाठी रस्त्यावरची धारदार लढाई केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचे मौन पाहता त्यांची विचारधारा ही ‘सनातन’सारखीच असल्याने त्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
अॅड. विवेक घाटगे म्हणाले, ज्येष्ठ नेते पानसरे हे आमच्यासाठी आदरनीय आहेत. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्याचे वकीलपत्र कोल्हापूरसह सहा जिल्ह्णांतील वकील घेणार नाहीत. या संस्थेवर बंदी घालून राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा.
शिष्टमंडळात रघुनाथ कांबळे, बन्सी सातपुते, शिवाजीराव परुळेकर, संभाजी जगदाळे, अनिल चव्हाण, आशा कुकडे, उमेश पानसरे, तौफिक मुल्लाणी, मधुकर माने, अण्णा मालेकर, रियाज शेख, प्रदीप कवाळे, दिलदार मुजावर, जमीर शेख, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
निवेदनातील मागण्या ...
पानसरे यांच्या हत्येचा तपास त्वरित करून समीर गायकवाडच्या मागील सूत्रधार, संस्था व राजकीय प्रेरणा यांचा तपास करून कडक शिक्षा द्यावी.
खुनाचा तपास राजकीय हस्तक्षेपविरहित व शहीद हेमंत करकरेंच्या कार्यपद्धतीने व हायकोर्टाच्या निगराणीखाली व्हावा.
यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची राज्य सरकारने बदली करून तपासात हस्तक्षेप केला आहे. आता तपासात गती घेतली असताना त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप झाल्यास असंतोष निर्माण होईल.
बहुसंख्याक धर्माच्या नावाने राज्यघटनाविरोधी कारवाया करून सहिष्णू भारतीय संस्कृतीला बदनाम करणाऱ्या हिंदू जनजागरण समिती, हिंदू राष्ट्र सेना, बजरंग दल, श्रीराम सेना, शिवप्रतिष्ठान, दुर्गा वाहिनी या संघटनांबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी.