दुष्काळ जाहीर करा - शिवसेना
By Admin | Updated: September 8, 2015 02:09 IST2015-09-08T02:09:34+5:302015-09-08T02:09:34+5:30
मराठवाडा व अन्य काही जिल्ह्यांमधील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा खाली आलेली असताना तत्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली.
दुष्काळ जाहीर करा - शिवसेना
मुंबई : मराठवाडा व अन्य काही जिल्ह्यांमधील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा खाली आलेली असताना तत्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली.
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. मागील सरकारने राज्यात भीषण टंचाई असतानाही दुष्काळ जाहीर न करताच मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे धाडला होता. त्यामुळे दुष्काळ जाहीर न करताच प्रस्ताव का पाठवला, अशी विचारणा तत्कालीन केंद्र सरकारने केली होती. आता आपण सत्तेत आल्यावर पुन्हा त्याच चुका करीत आहोत.
मागील सरकारचे अनुकरण करीत ‘दुष्काळसदृश परिस्थिती’ असा फसवा शब्दप्रयोग करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असून, त्यापूर्वी दुष्काळ जाहीर करण्याचा शिवसेनेचा आग्रह
आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून, दिलासा देण्याकरिता काही निकष शिथिल करण्यात येणार असून, त्याकरिता वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती १५ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे या वेळी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)