declare belgaum Union Territory demands cm uddhav thackeray | महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री

मुंबई: बेळगाव सीमा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यानं केंद्र सरकारनं संबंधित भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. बेळगाव म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकारनं बेळगावचं नामकरण बेलगाम करून तिथे बेलगामपणे अत्याचार सुरू केले आहेत. याविरोधात आपण पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

कर्नाटकात असलेलं बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे. या विषयावरील 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मोठे नेते उपस्थित होते.'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन पेटलं असताना तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत आले होते. त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येनं माहिम चर्च परिसरात उपस्थित होते. ती घटना मी कधीही विसरू शकत नाही. आजही तो प्रसंग आठवल्यानंतर अंगावर काटा येतो. पंतप्रधानांना मागण्यांचं निवेदन देण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते. पण देसाईंचा ताफा एका क्षणासाठीही न थांबता निघून गेला,' अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

'पंतप्रधानांचा ताफा थांबला तर नाहीच, उलट एका फोटोग्राफर आणि कार्यकर्त्याला उडवून गेला. त्यानंतर दगडफेक झाली. पोलीस, शिवसैनिक आमनेसामने आले. त्या रात्री मुंबई पेटली. मी त्यावेळी लहान होतो. आम्ही कलानगरला राहायचो. मार्मिकची कचेरी दादरमध्ये होती. आम्ही मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास दादरमध्ये होतो. तिथून घरी परतत असताना बाळासाहेबांनी माँ साहेबांना बॅग भरून ठेवायला सांगितली. कारण आपल्याला अटक होणार याची कल्पना त्यांना आली होती. त्यांचा तो अंदाज खरा ठरला,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरीही बेळगावबद्दलचं त्यांचं धोरण बदलत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही तिथलं सरकार बेळगावचं नामांतर करतं. बेळगावला उपराजधानीचा दर्जा देतं. तिथे विधिमंडळाचं अधिवेशन घेतं.  आपण मात्र कायद्याचा विचार करत राहतो. बेळगाव महाराष्ट्रात आणायचं असल्यास आपल्याला एकजूट दाखवावी लागेल. पुन्हा आग जागवावी लागेल. निखारा धगधगता आहेच. त्यावरील राख फुंकर मारून बाजूला करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बेळगावसाठी पेटून उठण्याचं आवाहन उपस्थितांना केलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: declare belgaum Union Territory demands cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.