हे तर घोषणाबाज सरकार!
By Admin | Updated: February 7, 2015 02:06 IST2015-02-07T02:06:42+5:302015-02-07T02:06:42+5:30
महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा कागदावरच आहे, वीजेवरचे अनुदान बंद केले आहे, कृषीमालाचे भाव घसरलेले आहेत, त्यांना मदतीची घोषणा झाली प्रत्यक्षात हाती काहीच नाही,

हे तर घोषणाबाज सरकार!
मुंबई : महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा कागदावरच आहे, वीजेवरचे अनुदान बंद केले आहे, कृषीमालाचे भाव घसरलेले आहेत, त्यांना मदतीची घोषणा झाली प्रत्यक्षात हाती काहीच नाही, एफआरपीनुसार दर देण्याची घोषणाही हवेत विरली, एलबीटीबाबत या सरकारने घुमजाव केले आहे.त्यामुळे राज्यातील महायुतीचे सरकार केवळ घोषणाबाज सरकार ठरले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकाराव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
प्रदेश काँग्रेसच्यावतीने ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ नावाची पुस्तीका शुक्रवारी काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिली आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पळ काढल्याचे सांगत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत झालेली प्रश्नोत्तरे अशी -
प्रश्न : तुमच्या पुस्तिकेत उल्लेखलेला काळा पैसा आणि पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा राज्य शासनाशी काय संबंध?
ठाकरे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या निवडणुका याच विषयावर जिंकल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत म्हणून यात त्यांचा उल्लेख केला आहे.
प्रश्न : राज्यात युती सरकार आल्यानंतर नेमक्या किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या?
विखे : पुस्तकात आत्महत्येचा आकडा छापलेला नाही मात्र मागील तीन महिन्यात सुमारे ३०० आत्महत्या झाल्या आहेत. एकट्या विदर्भात १७५ आत्महत्या आहेत.
प्रश्न : युती सरकारने जलसिंचनाची एसीबीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला आपले समर्थन आहे का?
ठाकरे : काही तरी आधार असेल म्हणूनच सरकारने तसे केले असेल. काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे.
प्रश्न : मागचे मुख्यमंत्री गतिमान निर्णय घ्यायचे की आत्ताचे?
ठाकरे : हे सरकार गोंधळलेले आहे. कोणाच्यातरी दबावाखाली
हे सरकार निर्णय घेत आहे.
आमच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरनाम्यात ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यावर निर्णय घेतले होते. हे सरकार ते देखील करत नाही.
प्रश्न : नारायण राणेंनी श्रेष्ठींना पत्र लिहीले आहे. राज्यात सहा सहा वर्षे प्रदेशाध्यक्ष बदलला जात नाही. त्यावर आपले मत काय?
ठाकरे : सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी मतं द्यावीत असे मीच सर्वांना कळवले होते. त्यानुसार राणे यांनी त्यांचे मत कळवले आहे.