सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण निर्णायक टप्प्यावर

By Admin | Updated: October 10, 2014 05:23 IST2014-10-10T05:23:08+5:302014-10-10T05:23:08+5:30

लोकसभा निवडणुकीत पूत्र माजी खासदार नीलेश राणे यांचा झालेल्या पराभवामुळे खचलेल्या माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे

In the decisive phase of politics of Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण निर्णायक टप्प्यावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण निर्णायक टप्प्यावर

लोकसभा निवडणुकीत पूत्र माजी खासदार नीलेश राणे यांचा झालेल्या पराभवामुळे खचलेल्या माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान उभे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन मतदारसंघापैकी दोन ठिकाणी स्वत: राणे आणि त्यांचे दुसरे पूत्र नीतेश राणे नशीब आजमावत असल्याने राणेंसाठी ही लढाई अस्तिवाची बनली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील राजकारण खऱ्या अर्थाने निर्णायक टप्प्यावर असून या निवडणुकीतच आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास पाहता गेल्या २५ वर्षात नारायण राणे यांनी जिल्ह्याचे राजकारण सतत आपल्याभोवती फिरणारे ठेवले आहे. १९९0 पासून सन २00५ पर्यंत म्हणजे शिवसेनेत असताना आणि त्यानंतर गेली दहा वर्षे काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे याबाबत समीकरणच जुळलेले आढळून आले आहे. या समीकरणाला मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीने पहिल्यांदा छेद दिला आहे. मोदी लाटेवर स्वार होवून माजी खासदार नीलेश राणे यांचा दारूण पराभव करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या रूपाने शिवसेनेला पुन्हा वैभव मिळाले आहे. नीलेशच्या पराभवामुळे राणे व्यथितही झाले होते. आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे पुन्हा नव्याने दमाने उतरले आहेत. त्यामुळे यावेळची लढाई फार निर्णायक होणार आहे. त्यातच त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रचारसमितीप्रमुख पदाची जबाबदारी असल्याने त्यांच्यासाठी राज्यभरात प्रचाराचे आणखीन एक आव्हान आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. यात गतनिवडणुकीत कणकवली मतदारसंघात भाजपाचे प्रमोद जठार, कुडाळमधून काँग्रेसचे नारायण राणे आणि सावंतवाडीमधून राष्ट्रवादीचे दीपक केसरकर निवडून आले होते. आता विधानसभेच्या आखाड्यात हे विद्यमान तिन्ही आमदार पुन्हा एकदा नशिब अजमावत आहेत. मात्र, दीपक केसरकर मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार झाले होते. आता ते शिवसेनेकडून रिंगणात आहेत.
कणकवली मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. येथे भाजपातर्फे प्रमोद जठार यांच्यासमोर काँग्रेसच्यावतीने नारायण राणे यांचे सुपूत्र नीतेश राणे युवानेतृत्व म्हणून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीतर्फे अतुल रावराणे आणि शिवसेनेतर्फे सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर आखाड्यात उतरले आहेत. काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष म्हणून आमदार विजय सावंत यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली असल्याने या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे. याठिकाणी जठार यांना पुन्हा संधी मिळते की नीतेश राणे पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ-मालवणमध्ये लढत ही नारायण राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यात समोरासमोर होत आहे. मात्र, या ठिकाणी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते पुष्पसेन सावंत यांनी उडी घेतल्याने आणि भाजपानेही विष्णू मोंडकर यांच्या रूपाने उमेदवार उभा केल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होणार आहे. त्या मतविभागणीचा फायदा कोणाला होणार यावर बहुतांशी गणिते अवलंबून असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत २१ हजारांचे मताधिक्य येथे शिवसेनेला मिळाले होते. परंतु यावेळी नारायण राणे सातव्यांदा येथे रिंगणात असल्याने येथे कोण बाजी मारणार याबाबत तर्क करणे अवघड बनले आहे. सावंतवाडीमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग या तीन तालुक्यांचा समावेश होतो. याठिकाणची लढाई मात्र स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले दीपक केसरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून केसरकर यांचे समर्थक असलेले दोडामार्गचे नेते सुरेश दळवी, भाजपाकडून नारायण राणेंचे एकेकाळचे विश्वासू शिलेदार राजन तेली व जिल्ह्यातील एकमेव जागा लढणाऱ्या मनसेकडून परशुराम उपरकर हे रिंगणात असल्याने खऱ्या अर्थाने केसरकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे आहे. तीन माजी आमदारांमध्ये ही लढत होत आहे. त्यामुळे सावंतवाडीतील लढत केसरकरांचे अस्तित्व पणाला लावणारी ठरली आहे.

Web Title: In the decisive phase of politics of Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.