धनगर आरक्षणाचा निर्णय आमच्या हातात नाही; जानकरांनी हात झटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 05:55 AM2019-08-26T05:55:23+5:302019-08-26T05:55:53+5:30

१६ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे रासपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

The decision of reservation of dhangar is not in our hands; Janakar shook hands | धनगर आरक्षणाचा निर्णय आमच्या हातात नाही; जानकरांनी हात झटकले

धनगर आरक्षणाचा निर्णय आमच्या हातात नाही; जानकरांनी हात झटकले

Next

मुंबई : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर पाच वर्षांपूर्वी राजकीय वातावरण ढवळून काढणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आता आरक्षणाचा मुद्दा आमच्या हातात नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. सरकारने सकारात्मक प्रतिज्ञापत्रक न्यायालयात सादर केले असून आता न्यायालयाने निर्णय दिला तर आरक्षण देऊ, असेही त्यांनी सांगितले.


१६ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे रासपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजा
मुंडे, आमदार राहुल कुल, प्रवीण दरेकर, बाळासाहेब दोडतले यांच्यासह रासपचे पदाधिकारी उपस्थित होते. धनगर आरक्षणाचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगतानाच धनगरांबाबतच्या निर्णयांना विलंब झाल्याची कबुलीही जानकर यांनी या वेळी दिली.


धनगर आरक्षणाचे वादळ आम्हीच उभे केले, न्यायसुद्धा आम्हीच देणार. राज्यात सत्ता आल्यानंतर आदिवासींना धक्का न लावता त्यांच्या २२ योजना धनगर समाजाला लागू केल्या. एक हजार कोटींचा निधी दिला. काँग्रेस, राष्ट्रवादीने तर ओबीसी समाजाचा वापर कडीपत्यासारखा केला. धनगरांची अवस्था त्याहून वाईट होती. मात्र, भाजप सरकारने दोन कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री आणि एक राज्यसभा खासदार देत धनगर समाजाला राजकीय वाटा दिल्याचे जानकर यांनी सांगितले.
रासप ही महायुतीचा भाग आहे. पक्षाची जिथे ताकद आहे तिथे तिथे आम्हाला संधी मिळायलाच हवी, असे सांगतानाच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आम्ही ५७ जागांची मागणी केल्याचे जानकर म्हणाले.


महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत रासपला मान्यता मिळाली आहे. आणखी दोन राज्यांची भर पडली तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल. त्यादृष्टीने उत्तराखंड आणि हरयाणा निवडणुकांसाठी तयारी सुरू असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती
रासपच्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील विविध मंत्री, नेते येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, भाजप नेते अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री आणि आठवले दिल्लीत असल्याने मेळाव्याला येऊ शकले नसल्याचे जानकर यांनी सांगितले.

Web Title: The decision of reservation of dhangar is not in our hands; Janakar shook hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.