शहीद नितीन कोळींच्या गावी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 14:05 IST2016-10-29T14:03:42+5:302016-10-29T14:05:27+5:30
गावचे सुपुत्र शहीद झाल्याने गावात दिवाळी न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.. दिवाळीनिमित्त घरावर लावलेले आकाशदिवे काढण्यात आले आहेत.

शहीद नितीन कोळींच्या गावी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 29 - पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी शहीद झाले आहेत. जम्मूच्या कुपवाड्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात नितीन सुभाष कोळी यांना वीरमरण आलं. नितीन कोळी मुळचे दुधगाव (ता. मिरज) येथील असून बीएसएफच्या 156 बटालियनमध्ये कार्यरत होते. नितीन कोळी शहीद झाल्याचं कळताच दुधगावात शोककळा पसरली असून गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.
दुधगाव ग्रामपंचायतजवळ ग्रामस्थांनी शोकसभा घेऊन शहीद नितीन कोळी यांना श्रध्दांजली वाहिली. गावचे सुपुत्र शहीद झाल्याने गावात दिवाळी न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.. दिवाळीनिमित्त घरावर लावलेले आकाशदिवे काढण्यात आले आहेत.
माछिल सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालत असताना बीएसएफ जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात नितीन कोळी यांना वीरमरण आलं.
नितीन सुभाष कोळी यांच्याबद्दल माहिती -
- शहीद नितीन सुभाष कोळी (वय ३०) यांचे मूळगाव मिरज तालुक्यातील दुधगाव असून आई-वडील मजुरी करतात.
- नितीन कोळी २००८ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले
- नितीन यांचा विवाह २०१० मध्ये झाला असून त्यांना दोन मुले आहेत.
- नितीन यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, लहान भाऊ आणि मुलगा असा परिवार आहे.