मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घ्या, अन्यथा मुंबईतील मोर्चात उद्रेक
By Admin | Updated: September 26, 2016 21:36 IST2016-09-26T21:36:02+5:302016-09-26T21:36:02+5:30
मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघत आहेत

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घ्या, अन्यथा मुंबईतील मोर्चात उद्रेक
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26 - मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघत आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे. राज्यभरातील मागण्या सारख्याच आहेत. असे असताना शासन मोर्चेकऱ्यांशी चर्चा करू, असे म्हणत आहे. आमच्याशी चर्चा करण्याऐवजी मागण्या पूर्ण करा, अन्यथा मुंबईत होणाऱ्या मोर्चात समाजबांधवांचा उद्रेक होईल, असा इशारा दहा ते बारा मराठा संघटनांनी सोमवारी औरंगाबादेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ ९ आॅगस्ट रोजी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा झाला. अहिंसा, शिस्त आणि स्वच्छतेचा संदेश या मोर्चातून संपूर्ण राज्याला दिला. मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करणाऱ्या मराठा संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांची सोमवारी येथे बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र काळे आणि राजेंद्र जंजाळ म्हणाले की, संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. हे सर्व मोर्चे शांततेच्या मार्गाने होत आहेत. मात्र, कोपर्डीची घटना, मराठा आरक्षणाचा प्रश्न, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर याबाबत मराठा समाजात तीव्र संताप आहे. कोणत्याही घटनेत ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांनी अद्यापही पीडितेच्या आई-वडिलांचा जबाब नोंदविला नाही.
आम्ही अॅट्रॉसिटी कायद्यात काळानुसार बदल करण्याची मागणी करीत आहोत. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची आमची मागणी नाही. असे असताना काही लोक याबाबत अफवा पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. मात्र, आजपर्यंत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर एकदाही चर्चा केलेली नाही. तसेच शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी स्वामीनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्या आहेत.
चर्चा कशाला? निर्णय घ्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा मोर्चांच्या नेत्यांशी चर्चा करणार, असे वारंवार सांगत आहेत. आमच्या या मोर्चाला नेता नाहीच. मराठा मोर्चाचे नेतृत्व हे संपूर्ण समाज करीत आहे. मग तुम्ही चर्चा कोणासोबत करणार, असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या निवेदनातील मागण्यांसंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, असे आवाहन संघटनांनी केले.
या पत्रकार परिषदेला किशोर चव्हाण, अप्पासाहेब कुढेकर, अभिजित देशमुख, विनोद पाटील, राहुल बनसोड, किशोर थोरात, रवी सोडतकर, प्रा.प्रदीप सोळुंके, संजय सावंत, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश केरे, नगरसेवक विजय औताडे, राज वानखेडे, सखाराम काळे आदींची उपस्थिती होती.
मराठा क्रांती मोर्चासंदर्भात ३० रोजी मुंबईत बैठक
राज्यभरातील मोर्चानंतर मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी करण्यासाठी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चा समन्वय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर येथील शिवाजी नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.