डेक्कन क्वीनला मिळाली नवी ‘डायनिंग कार’
By Admin | Updated: May 30, 2015 09:07 IST2015-05-30T01:04:54+5:302015-05-30T09:07:40+5:30
दुरुस्तीच्या नावाखाली मागील सात महिन्यांपूर्वी डेक्कन क्वीनपासून वेगळी करण्यात आलेली डायनिंग कार पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

डेक्कन क्वीनला मिळाली नवी ‘डायनिंग कार’
पुणे : दुरुस्तीच्या नावाखाली मागील सात महिन्यांपूर्वी डेक्कन क्वीनपासून वेगळी करण्यात आलेली डायनिंग कार पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. डेक्कन क्वीनच्या वर्धापन दिनी येत्या सोमवारी ही कार पुन्हा जोडली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने एक प्रकारे प्रवाशांना आपल्या ‘क्वीन’च्या वर्धापन दिनाची भेट दिली आहे.
भारतीय रेल्वेच्या शिरपेचातील तुरा असलेल्या आणि प्रवाशांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेली डेक्कन क्वीन ही रेल्वेगाडी सध्या डायनिंग कारविना धावत आहे. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात दुरुस्तीच्या नावाखाली ही कार डेक्कन क्वीनपासून वेगळी करण्यात आली होती. त्यानंतर ही डायनिंग कार भंगारात काढण्यात येणार असल्याचा निर्णयही मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केला. त्यावर रेल्वे प्रवासी संघटना तसेच प्रवाशांनी त्याला मोठा विरोध केला. मात्र, प्रवाशांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने ही कार पुन्हा नव्या स्वरूपात डेक्कन क्वीनला जोडणार असल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपासून या कारमध्ये काही बदल करण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाले असून, येत्या सोमवारी ही कार डेक्कन क्वीनला जोडली जाणार आहे. सोमवारी डेक्कन क्वीनचा ८६ वा वर्धापन दिन आहे. त्या दिवशी प्रवाशांना ही भेट दिली जाणार आहे.
डायनिंग कारसाठी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी पाठपुरावा केला होता. त्या म्हणाल्या, ‘‘डेक्कन क्वीनला ऐतिहासिक महत्त्व आहे. दि. १ जून १९३० पासून या गाडीला डायनिंग कार ही सुविधा देण्यात आली होती. अनेक प्रवासी प्रवासादरम्यान या कारमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेत होते. मात्र, प्रशासनाने ही कार काढण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने डायनिंग कार पुन्हा जोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांसाठी ही आनंददायी बाब आहे.