कर्जापोटी मुलगा तारण
By Admin | Updated: December 26, 2014 00:56 IST2014-12-26T00:56:01+5:302014-12-26T00:56:01+5:30
उधार घेतलेल्या १० हजार रुपयांच्या रकमेची परतफेड करण्यासाठी मेळघाटातील एका आदिवासी पित्याने आपला १४ वर्षांचा मुलगाच यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात मेंढपाळाकडे तारण ठेवल्याचा

कर्जापोटी मुलगा तारण
मेळघाटातील आदिवासी पित्याची अगतिकता : पोलिसांनीच सुखरूप घरी पोहोचविले
किशोर वंजारी - नेर (यवतमाळ)
उधार घेतलेल्या १० हजार रुपयांच्या रकमेची परतफेड करण्यासाठी मेळघाटातील एका आदिवासी पित्याने आपला १४ वर्षांचा मुलगाच यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात मेंढपाळाकडे तारण ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
हे प्रकरण नेर पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी या बालकाला त्याच्या गावी सुखरुप पोहोचवून त्याची सुटका केली. महादेव संजू ऊर्फ दातू कासदेकर (१४) रा. डाबका ता. धारणी जि. अमरावती असे या आदिवासी मुलाचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याच्या पिंपळगाव (डुब्बा) या गावात सीताराम कोडापे हा मेंढपाळ राहतो. तो तीन महिन्यांपूर्वी डाबका गावात आपल्या जावयाकडे गेला होता. तेथे त्याची भेट महादेवच्या वडील संजू कासदेकर याच्याशी झाली. कासदेकर याने आपली आर्थिक परिस्थिती कथन करून मेंढपाळाकडे १० हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली. या रकमेची परतफेड करण्यासाठी आपल्या १४ वर्षीय महादेव या मुलाला मेंढपाळाकडे कामासाठी पाठविण्याची तयारी दर्शविली. हा व्यवहार मान्य झाल्याने मेंढपाळाने १० हजार रुपये महादेवच्या पित्याला उधार म्हणून दिले. त्याचवेळी महादेवला कामासाठी तो पिंपळगाव (डुब्बा) येथे सोबत घेऊन आला.
गेल्या तीन महिन्यांपासून महादेव मेंढपाळाकडे मेंढ्या चारण्याचे काम करीत होता. त्यापोटी त्याला अडीच हजार रुपये दरमहा मजुरी ठरली होती. महादेवच्या पित्याकडून काही तक्रार आल्यास सदर मेंढपाळाविरुद्ध कारवाई करता येईल, अशी प्रतिक्रिया या घटनेवर नेरचे ठाणेदार गणेश भावसार यांनी ‘लोकमत’कडे नोंदविली. उपरोक्त घटनेवरून आदिवासीबहुल मेळघाटातील शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारी हतबलता उघड झाली आहे. संजू कासदेकर याला दोन पत्नी, चार मुले व दोन मुली आहेत.
मुलाला आणायला तिकिटासाठीही नव्हते पैसे
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी महादेवला धनज येथील पोलीस पाटलाकडे आणले. त्यांनी त्याला नेर पोलीस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता या घटनेवर महादेवच्या कथनातून शिक्कामोर्तब झाले. नेर पोलिसांनी महादेवला घेऊन जावे म्हणून त्याच्या वडिलाकडे संदेश पाठविला. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तिकिटासाठीही पैसे नसल्याने ते येऊ शकले नाहीत. अखेर नेर पोलिसांनीच २३ डिसेंबर रोजी महादेवला डाबका येथे सुखरुप पोहोचविले.