वांद्रे रेक्लमेशन येथील डेब्रिज उचलले
By Admin | Updated: July 15, 2017 02:13 IST2017-07-15T02:13:43+5:302017-07-15T02:13:43+5:30
वांद्रे पश्चिम परिसरातील वांद्रे रेक्लमेशन भागात टाकण्यात आलेले डेब्रिज उचलण्यात आले

वांद्रे रेक्लमेशन येथील डेब्रिज उचलले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरातील वांद्रे रेक्लमेशन भागात टाकण्यात आलेले डेब्रिज उचलण्यात आले असून, ज्या वाहनातून राडारोडा टाकण्यात आला होता, त्या वाहनाचा क्रमांक मिळवून त्याआधारे पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
‘लोकमत’ने शुक्रवारी ‘योजना फसली : वांद्रे रेक्लमेशनवर डेब्रिजचा खच’ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल महापालिका मुख्यालयाने घेतली. यावर महापालिकेच्या ‘एच/पश्चिम’ विभागाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम परिसरातील वांद्रे रेक्लमेशन भागात जिथे राडारोडा टाकण्यात आला होता, तो भाग ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ यांच्या अखत्यारीत आहे. ज्या वाहनातून राडारोडा टाकण्यात आला होता, त्या वाहनाचा क्रमांक मिळवून त्याआधारे पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्यात आली आहे. शिवाय वाहनाची नोंदणी रद्द करण्याबाबतही प्रादेशिक परिवहन कार्यालयाला कळविण्यात आले आहे, असे एच/पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे येथील राडारोडा हटविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.