साडीचा पदर दुचाकीच्या चाकामध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: May 9, 2017 13:22 IST2017-05-09T13:05:52+5:302017-05-09T13:22:35+5:30
साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकामध्ये अडकल्यामुळे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला.

साडीचा पदर दुचाकीच्या चाकामध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पेण, दि. 9 - साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकामध्ये अडकून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर खारपाले गावाजवळ ही दुर्घटना घडली. प्रगती चौगले (41) असे मृत महिलेचे नाव आहे. पतीसोबत प्रगती दुचाकीवरुन दुस-या गावामध्ये चालली असताना ही दुर्घटना घडली.
प्रगती दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेली असताना वा-यामुळे तिचा पदर चाकामध्ये अडकला आणि ती खाली पडली. दुचाकीबरोबर प्रगती काही अंतरापर्यंत फरफटत गेली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. हा प्रकार पतीच्या लक्षात येताच त्याने लगेच गाडी थांबवून जखमी प्रगतीला घाडाप येथील डॉक्टरकडे घेऊन गेला.
त्यानंतर तिला पेण येथील रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. त्यांनी प्रगतीला शस्त्रक्रियेसाठी मुंबईच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. प्रगतीचे नातेवाईक तिला घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले असताना तिची प्रकृती अधिकच खालावली त्यामुळे तिला परत पेण येथील रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.