सिलिंडर स्फोटात महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: March 1, 2017 03:33 IST2017-03-01T03:33:34+5:302017-03-01T03:33:34+5:30
भार्इंदर पूर्वेतील इंद्रलोक भागात मजुरांच्या चार झोपड्यांना आग लागल्याने गॅस सिलिंडरच्या स्फोटात एका अपंग महिलेचा मृत्यू झाला.

सिलिंडर स्फोटात महिलेचा मृत्यू
मीरा रोड : भार्इंदर पूर्वेतील इंद्रलोक भागात मजुरांच्या चार झोपड्यांना आग लागल्याने गॅस सिलिंडरच्या स्फोटात एका अपंग महिलेचा मृत्यू झाला. आग लागताच तीन मुले बाहेर पळाल्याने थोडक्यात बचावली.
येथील बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ आनंदपार्क जवळील रिकाम्या भूखंडावर विकासकाने पाच मजुरांच्या कुटुंबियांना राहण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे मजूर झोपड्या बांधून राहत होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सर्व मजूर कामावर निघून गेले. तर लहान मुले परिसरातच खेळत होती. पावणेदहाच्या सुमारास आग लागून झोपड्यांचे प्लास्टीक पेटू लागले. झोपड्यांना आग लागताच तीन मुले घाबरुन बाहेर पळाली. या वेळी एका झोपडीत असलेली कृष्णा दास (३६) ही अपंग महिला मात्र आतच अडकली. झोपड्यांमधील एकापाठोपाठ एक असे तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. कृष्णा ही जीवाच्या आकांताने मदतीसाठी आोरडत होती. पण सिलिंडरचे स्फोट व भडकलेल्या आगीमुळे तिला वाचवण्यात अपयश आले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने जवळची इमारत व वीजेच्या ट्रान्सफार्मरला झळ बसण्यापूर्वीच आग आटोक्यात आणली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी अकस्माक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)
>शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. वीज पुरवठा करणाऱ्या रिलायन्स वा टाटा तसेच सिलिंडर पुरवणाऱ्या वितरकांना नोटीसा बजावणार आहोत असे प्रभारी मुख्य अग्नीशमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.