काश्मीरने घडविले मृत्यूचे पर्यटन

By Admin | Updated: September 11, 2014 09:22 IST2014-09-11T03:24:05+5:302014-09-11T09:22:57+5:30

१५ दिवसांपूर्वीच डोंबिवलीहून श्रीनगरला गेलो. ३० आॅगस्टपासून सोसाट्याचा वारा अन् जोरदार पावसाला सुरुवात झाली. श्रीनगरसह परिसराचा उर्वरित भारताशी संपर्क तुटला होता.

Death Tourism | काश्मीरने घडविले मृत्यूचे पर्यटन

काश्मीरने घडविले मृत्यूचे पर्यटन

अनिकेत घमंडी, डोंबिवली
१५ दिवसांपूर्वीच डोंबिवलीहून श्रीनगरला गेलो. ३० आॅगस्टपासून सोसाट्याचा वारा अन् जोरदार पावसाला सुरुवात झाली. श्रीनगरसह परिसराचा उर्वरित भारताशी संपर्क तुटला होता. वीजच नसल्याने तेथे मोबाइल-लॅपटॉप सर्व काही हाताशी असूनही फायदा झाला नाही. परमेश्वराचा धावा करणे एवढेच हातात होते. केंद्र सरकारने कोट्यवधींची मदत जाहीर केल्याचे डोंबिवलीत परतल्यावर समजले. प्रत्यक्षात ती मदत अद्यापही लहान गावांना पोहोचलेली नाही... किशोर गडा यांना आलेला हा विदारक अनुभव त्यांनी ‘लोकमत’ला सांगितला.
टूर्सचा व्यवसाय करणारे गडा पर्यटकांना तिथे सोडून श्रीनगरला गेले होते. त्यांना तेथे आपुले मरण पाहिले म्यां डोळा, अशीच अनुभूती आली. ‘नजर जाईल तिथे पाणी. एरव्ही छोटी परंतु आकर्षक वाटणारी रंगीबेरंगी, टूमदार घरे पाण्याखाली होती. त्यामुळे गच्चीवर जेथे नजर जावी तिथे माणसं दिसत होती, अशा शब्दांत त्यांनी त्या दृश्याचे वर्णन केले.
हॉटेल सुलतानमध्ये गडा गेले १५ दिवस वास्तव्यास होते. मध्यंतरी पावसाचा वेग कमी झाल्यावर ते कसेबसे ‘दाललेक’ परिसरात जाऊन आले. मात्र तेथेही भयानक अवस्था होती. पायाखालची जमीनच नाहीशी झाल्यासाखे वाटत होते. पाण्याच्या प्रवाहात मेलेले प्राणी, जिथे कानोसा घ्यावा तेथे सेव्ह मी, बचाओ यासह अन्य विविध भाषांमधील ‘वाचवा वाचवा’चे टाहो ऐकू येत होते. ‘पटनी टॉप’च्या परिसराचीही हीच स्थिती होती. वैष्णोदेवीच्या मार्गावरच्या ‘त्रिकुटा’च्या पहाडाची पडझड झाली होती. ‘कुंद पहाडा’चीही अशीच काहीशी स्थिती होती. महिला आणि बालकांच्या रडण्याच्या आवाजाने कोणाकोणाला आणि कसे वाचवले जाणार, हे समजेनासे झाले होते, अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता मांडली.
दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झाला आणि पर्यटकांनी अक्षरश: पळ काढला. उधमपूर रेल्वे स्थानकातून ‘विवेक’ रेल्वे पकडून बॉम्बे सेंट्रल स्थानक गाठले आणि डोंबिवलीत घरी पोहोचल्यावर खऱ्या अर्थाने जिवात जीव आला... गडा यांचा हा अनुभव ऐकून कुटुंबीय हादरून गेले. तिथल्या चहाच्या (सुखदेव) नाक्यावरदेखील प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. वर्दळीच्या ठिकाणीही प्रत्येकाच्या मनात स्मशानशांतता पसरली होती, असे अनंत मंगळवेढेकर आणि संदीप जोशी यांनी सांगितले.

Web Title: Death Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.