उपचारांअभावी विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: December 27, 2014 04:22 IST2014-12-27T04:22:52+5:302014-12-27T04:22:52+5:30
विनोबा भावे आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मलेरियाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उपचारांअभावी आणखी

उपचारांअभावी विद्यार्थ्याचा मृत्यू
एटापल्ली (जिग़डचिरोली) : विनोबा भावे आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मलेरियाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उपचारांअभावी आणखी एक विद्यार्थी दगावल्याचे उघडकीस आले़ विशेष म्हणजे ताप आल्याने उपचार न करता त्याला पुजाऱ्याकडे नेण्यात आले़ उपचार वेळीच न मिळाल्याने या मुलाचा मृत्यू झाला़ पुजाऱ्याकडे उपचार करण्याची चूक मुलाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याची कबुली मृत विद्यार्थ्याच्या पित्याने दिली़
भूतबाधा टाळण्यासाठी शाळा खोल्यांना लिंबू-मिरची बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने उघडकीस आणला होता़ या कृत्याचा अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेसह समाजातील विविध स्तरावर निषेध व्यक्त करण्यात आला़ प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाईल, असे कृत्य टाळण्यात येईल, अशी भूमिका घेतली़ मात्र, दुसऱ्याच दिवशी याच आश्रमशाळेतील दुलसा चैतू उईके या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़
एटापल्ली तालुक्यातील हाचबोळी येथील चैतू उईके यांना दुलसा व देवसू ही दोन मुले असून, ते विनोबा भावे आश्रमशाळेत शिकतात. चैतू यांनी १९ डिसेंबरला दुलसाला गावी आणले होते़ घरी आल्यानंतर २३ डिसेंबर रोजी त्याला ताप आला़ उपचार न करता आईने त्याला गर्देवाडा येथे पुजाऱ्याकडे नेले़ यात बराच वेळ गेल्याने त्याची प्रकृती अधिकच बिघडली़ चैतू घरी आल्यानंतर त्यांनी बुधवारी दुलसाला एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन त्याला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.
त्यानंतर २५ डिसेंबर रोजी डॉक्टरांनी त्याला गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, गडचिरोलीला पोहोचण्यापूर्वीच गुरुवारी दुपारी दुलसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. (प्रतिनिधी)