वाशीत बसच्या धडकेत मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: March 4, 2017 05:16 IST2017-03-04T05:16:59+5:302017-03-04T05:16:59+5:30

बसच्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू होवुन दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी वाशीत घडली.

Death of son in Vashi bus crash | वाशीत बसच्या धडकेत मुलाचा मृत्यू

वाशीत बसच्या धडकेत मुलाचा मृत्यू


नवी मुंबई : बसच्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू होवुन दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी वाशीत घडली. दोघेही कोपरी येथील महापालिका शाळेचे नववीचे विद्यार्थी आहेत. त्यांना शाळेच्या शिक्षिकेने शाळा सुरू असताना खासगी कामासाठी बाहेर पाठवले होते. याप्रकरणी शक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
वाशी-कोपरखैरणे मार्गावर गावदेवी मंदिरालगत हा अपघात घडला. रमेश बोबडे (१५) व बाबू चव्हाण (१६) हे दोघे सायकलवरून जात असताना एनएमएमटी बसच्या धडकेने त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये रमेशचा मृत्यू झाला असून बाबू हा जखमी झाला आहे. दोघेही नववीचे विद्यार्थी असून कोपरी येथील महापालिका शाळेचे विद्यार्थी आहेत. शुक्रवारी शाळा सुरू असताना त्यांच्या शिक्षिका स्नेहल पाडेकर यांनी त्यांना खासगी कामासाठी वाशीला पाठवले होते.
त्यानुसार हे दोघेही सायकलवरून वाशीला आले होते. परत जाताना त्यांना एमएमएमटी (एमएच ४३ एच ५१३०) या मार्ग क्रमांक ६२ च्या बसची धडक बसली. वाशी डेपोकडून कल्याणच्या दिशेने बस जात होती. यामध्ये रमेशचा मृत्यू झाला, तर बाबू जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेप्रकरणी एमएमएमटी बस चालक दीपक रोहिदास पाटील (४९) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. तर शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना खासगी कामासाठी बाहेर पाठवल्यामुळे शिक्षिका स्नेहल पाडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे पालिका शिक्षण अधिकारी संदीप संगवी यांनी सांगितले. तसेच मयत विद्यार्थी रमेशच्या कुटुंबीयांना विम्याचे दीड लाख रुपये मदत स्वरूपात दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>कारवाईची मागणी
शिक्षिकेच्या हलगर्जीमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने तिच्यावर सक्त कारवाईची मागणी पालकांकडून होत आहे. एकीकडे महापालिका शाळांचा दर्जा उंचावत असताना, शिक्षकच विद्यार्थ्यांना खासगी कामासाठी जुंपत असल्याचा संतापही व्यक्त होत आहे.

Web Title: Death of son in Vashi bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.