कुख्यात गंड सल्या चेप्याचा ससून रुग्णालयात झाला मृत्यू
By Admin | Updated: December 23, 2015 14:14 IST2015-12-23T13:13:10+5:302015-12-23T14:14:29+5:30
महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम महंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या याचा बुधवारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला

कुख्यात गंड सल्या चेप्याचा ससून रुग्णालयात झाला मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २३ - महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम महंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या याचा बुधवारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. या खटल्याची सुनावणी सुरू असतानाच सल्या चेप्या याच्यावर वर्चस्वाच्या वादातून तीनवेळा हल्ला झाला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यात सल्याचेप्याच्या मणक्यात गोळी लागली होती, उपचारांदरम्यानच त्यात संसर्ग झाल्याने सल्याचेप्याचा आज मृत्यू झाला.
मलकापूर येथील डीएमएस कॉम्प्लेक्ससमोर दि. १५ जानेवारी २००९ रोजी संजय पाटील यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या प्रकरणात मार्च २००९ अखेर सागर परमार, सलीम महंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या, बाबासाहेब मोरे, लाजम होडेकर, हमीद शेख, मुदस्सर मोमीन, सचिन चव्हाण, संभाजी खाशाबा पाटील ऊर्फ एस. के. या सातजणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अटकेत असणाऱ्या सल्या चेप्या याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात पहिला जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य वाढल्यामुळे सल्यासह इतर आरोपींना न्यायालयात हजर करताना पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येऊ लागला. ऑक्टोबर २००९ मध्ये कऱ्हाडच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात सल्यावर पुन्हा गोळीबार झाला. त्यातून सल्या बचावला. मात्र, दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असतानाच वर्चस्ववादातून सल्यावर कऱ्हाडच्या न्यायालयात तिसऱ्यांदा हल्ला झाला. अखेर आज त्याचा मृत्यू झाला.