स्वाईन फ्लूने पाच बालकांचा मृत्यू
By Admin | Updated: May 4, 2017 23:24 IST2017-05-04T23:24:25+5:302017-05-04T23:24:25+5:30
बुधवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लूची दहशत कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे.

स्वाईन फ्लूने पाच बालकांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 4 - बुधवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लूची दहशत कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या तीन महिन्यात नागपूर विभागात 81 रुग्ण पॉझिटीव्ह आले असून या रोगाने आतापर्यंत १९ रुग्णांचा बळी घेतला आहे. यात १३ महिला असून पाच बालकांचा समावेश आहे.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परिस्थिती नाजूक बनत चालली आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांचे दावे केले जात असले तरी स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या स्वाईन फ्लू रुग्णाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ८१ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सहा पुरुष असून १३ महिलांचा समावेश आहे.
-शहरात ४५ रुग्ण पॉझिटीव्ह
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ४५ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. यातील २९ रुग्ण बरे झझाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर सात रुग्ण अजूनही इस्पितळांमध्ये उपचार घेत आहे. स्वाईन फ्लू निष्पन्न झालेल्या रुग्णांमधून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चार बालकांचा समावेश आहे.
-मेडिकलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात २७ वर्षीय अंजुम सय्यद, रा. मोठा ताजबाग व ४२ वर्षीय धनपाल ठाकरे रा. दुर्गा नगर अशी मृताची नावे आहे. या शिवाय तीन रुग्ण उपचार घेत असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यात सात वर्षीय मुलीचाही समावेश आहे.