पित्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: April 24, 2015 01:28 IST2015-04-24T01:28:03+5:302015-04-24T01:28:03+5:30
पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून कुऱ्हाडीने वार करून मुलाला ठार केल्याची दुर्दैवी घटना तलासरी तालुक्यातील कुर्झे गावितपाडा येथे घडली.

पित्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू
तलासरी : पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून कुऱ्हाडीने वार करून मुलाला ठार केल्याची दुर्दैवी घटना तलासरी तालुक्यातील कुर्झे गावितपाडा येथे घडली. सुरेश लक्ष्मण धोडी (४५) असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने पत्नी ऊर्मिला आणि मुलगी अंजली यांनाही गंभीर जखमी केले असून, हल्ल्यानंतर तो पसार झाला. या घटनेमुळे गावितपाडा भागात हळहळ व्यक्त होत आहे.
सुरेशच्या मनात पत्नी ऊर्मिला हिच्या चारित्र्याबाबत संशय होता. या कारणावरून तो तिला नेहमी मारहाण करीत असे. आईला मारहाण होत असल्याचे बघून मुलगा नितीन धोडी (१९) हा भांडणामध्ये पडत असल्याने त्याच्यावरही सुरेशचा राग होता. गुरुवारी पहाटे ३च्या सुमारास सुरेशने पत्नी ऊर्मिला व मुलगी अंजली यांना झोपेतून उठवून भाकरी बनवायला सांगितले.
मायलेकी भाकरी बनवीत असतानाच सुरेश धोडी याने घराबाहेर झोपलेल्या नितीनवर कुऱ्हाडीने वार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. बाहेर काही आवाज आल्याने ऊर्मिला घराबाहेर आली. या वेळी सुरेशने तिच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. आपल्या बापाचा क्रूर अवतार बघून मुलगी अंजली घराबाहेर धावत सुटली तेव्हा तिच्यावरही त्याने कुऱ्हाडीने वार केला.
सुरेशच्या घरातून आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. तेव्हा सुरेश पळून गेला. जखमी ऊर्मिला आणि अंजली यांच्यावर सिल्व्हासा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तलासरी पोलिसात अंजलीने फिर्याद दाखल केली असून, घटनास्थळाला पोलीस अधिकारी हरी बालाजी धूम आणि उपविभागीय अधिकारी अभिजित शिवतरे यांनी भेट दिली. पोलीस सध्या फरार सुरेशचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)