आंदोलनकर्त्या शिक्षकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 11, 2016 04:22 IST2016-06-11T04:22:57+5:302016-06-11T04:22:57+5:30

सर्व पात्र शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन चिघळले आहे.

Death of agitator teacher | आंदोलनकर्त्या शिक्षकाचा मृत्यू

आंदोलनकर्त्या शिक्षकाचा मृत्यू


मुंबई : राज्यातील अनुदानास पात्र अघोषित शाळा घोषित करून सर्व पात्र शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन चिघळले आहे. औरंगाबाद विभागातील शिक्षक गजानन खरात यांच्या मृत्यूने सर्वच शिक्षक संघटना सरकारविरोधात आक्रमक झाल्या आहेत. सोमवारपर्यंत शिक्षण विभागाने अनुदानाचे आदेश काढले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांच्या कृती समितीने दिला आहे.
कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, खरात यांच्या मृत्यूसाठी सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. तीन दिवसांपूर्वी १२ आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालत अनुदानाची मागणी केली होती. त्यावर दोन दिवसांत वित्तमंत्री व शिक्षणमंत्र्यांना अनुदान देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी आदेशाची पूर्तता केली असती, तर खरात यांचा मृत्यू झाला नसता. परिणामी या आंदोलनाला सर्वस्वी मुख्यमंत्रीच दबाबदार असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.
सोमवारपर्यंत आदेश निघाले नाही तर शिक्षक आमदार रामनाथ मोते, नागो गाणार, भगवानराव साळुंखे मंगळवारपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करतील, अशी माहिती शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी दिली. ते म्हणाले की, खरात यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची परिषदेची मागणी आहे. (प्रतिनिधी)

आंदोलनकर्त्या शिक्षकाचा मृत्यू राज्य शासन आणि शिक्षण विभागासाठी नक्कीच भूषणावह नाही. यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे यापुढे अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी आजच अनुदानाचे आदेश काढावेत, जेणेकरून राज्यातील विनावेतन शिकवणाऱ्या हजारो शिक्षकांना दिलासा मिळेल; नाहीतर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल.
- रामनाथ मोते, शिक्षक आमदार
आणखी किती शिक्षकांचे बळी घेणार ?
१० ते १५ वर्षे पगाराविना काम करणाऱ्या विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना पगार सुरू करण्यासाठी सरकार आणखी किती शिक्षकांचे बळी घेणार आहे? खरात यांचा मृत्यू राज्यासाठी अतिशय वेदनादायक आहे. आता तरी सरकारने सर्व पात्र विनाअनुदानित घोषित आणि अघोषित अशा सर्व शाळांना विनाविलंब अनुदान द्यावे. शिक्षकांचा आणखी अंत पाहू नये, नाहीतर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल.
- कपिल पाटील, शिक्षक आमदार
खरात कुटुंबीयांना भरपाई द्यावी!
१ जूनपासून उपोषणास बसलेले गजानन खरात यांना गुरुवारी प्रकृती हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दीड वर्षाचा मुलगा, पत्नी आणि वृद्ध आई आहे. त्यामुळे कुटुंबाला शासनाने १० लाख रुपये, पत्नीस नोकरी देण्याची मागणी कृती समितीचे प्रशांत रेडीज यांनी केली आहे.

Web Title: Death of agitator teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.