‘ताज’ला अखेरची मुदत

By Admin | Updated: June 24, 2015 02:08 IST2015-06-24T02:08:48+5:302015-06-24T02:08:48+5:30

सुरक्षेसाठी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या ताज महल हॉटेल व्यवस्थापनाला पालिकेने एप्रिल महिन्यात नोटीस बजावली होती़ त्यानुसार साडेपाच कोटी रुपये

The deadline for 'Taj' | ‘ताज’ला अखेरची मुदत

‘ताज’ला अखेरची मुदत

मुंबई : सुरक्षेसाठी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या ताज महल हॉटेल व्यवस्थापनाला पालिकेने एप्रिल महिन्यात नोटीस बजावली होती़ त्यानुसार साडेपाच कोटी रुपये दंड भरण्याची ताकीद हॉटेल व्यवस्थापनाला देण्यात आली होती़ परंतु वारंवार सुचना करुनही हॉटेल व्यवस्थापन प्रतिसाद देत नसल्यामुळे अखेर १५ दिवसांची अंतिम ताकीद ए विभाग कार्यालयाने दिली आहे़ त्यानंतर मात्र रस्ते व पदपथावरील बॅरिकेट्स तोडण्यात येतील, असा सक्त इशारा देण्यात आला आहे़ त्याचप्रमाणे ट्रायडन्टलाही २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
२००८ मध्ये अतिरेकी हल्लयानंतर मुंबईतील खाजगी हॉटेल्सला सुरक्षा यंत्रणा उभी करण्याची सुचना पोलिसांनी केली होती़ मात्र ताजमहल पॅलेस अ‍ॅण्ड टॉवर हॉटेलने आपल्या वास्तूबाहेरच सार्वजनिक रस्त्यावर बॅरिकेड्स व फुलझाडे लावून अतिक्रमण केले आहे़ ट्रायडेंट हॉटेलबाहेरही असे बॅरिकेट्स असल्याने पालिकेने एप्रिल महिन्यात नोटीस पाठवली होती़ याबाबतचे वृत्त सर्वप्रथम दै़ लोकमतने दिले होते़ याची दखल घेऊन स्थायी समितीने घटनास्थळाची पाहणी केली होती़ परंतु त्यानंतरही हॉटेल व्यवस्थापनाची मुजोरी कायम आहे़ या प्रकरणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या कार्यालयात नुकतीच बैठक झाली़
त्यानुसार पुन्हा एकदा ताज हॉटेलला नोटीस बजाविण्यात आली आहे़ ए विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सी़ चौरे यांनी या हॉटेलला बेकायदा बेरिकेट्स हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे़ २००९ पासून रस्ते व पदपथांचा बेकायदा वापर केल्याप्रकरणी साडेपाच कोटी रुपयांचा दंड भरण्याची ताकीदही दिली आहे़ मात्र यावेळीस नोटीसची दखल न घेतल्यास कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याची ताकीद पालिकेने दिली आहे़ याबाबत संपर्क करुनही ताज हॉटेल व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: The deadline for 'Taj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.