डीसीसी घोटाळा प्रकरण : चिठ्ठीत दोन माजी अध्यक्षांच्या नावामुळे खळबळ
By Admin | Updated: July 21, 2016 17:00 IST2016-07-21T17:00:39+5:302016-07-21T17:00:39+5:30
डीसीसी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेघराज आडसकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना सापडली असून या चिठ्ठीमुळे बँक घोटाळा प्रकरणाला वेगळेच वळण

डीसीसी घोटाळा प्रकरण : चिठ्ठीत दोन माजी अध्यक्षांच्या नावामुळे खळबळ
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २१ - डीसीसी घोटाळा प्रकरणातील एक आरोपी आणि माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे चिरंजीव मेघराज आडसकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना सापडली असून या चिठ्ठीमुळे बँक घोटाळा प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चिठ्ठीत डीसीसी बँकेच्या दोन माजी अध्यक्षांची नावे असल्याचे सूत्रांंनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आडसकर यांनी चिठ्ठीत आपण डीसीसी बँक घोटाळा प्रकरणातील चौकशीला कंटाळलो असून हे सगळे सहन होण्याच्या पलिकडचे असल्याचे म्हटले आहे.
डीसीसी घोटाळा प्रकरणात आपला सहभाग नसतानाही आपल्याला आरोपी केले असल्याचा ठपकाही त्यांनी चिठ्ठीत ठेवला आहे. डीसीसीच्या दोन माजी अध्यक्षांचा उल्लेख चिठ्ठीत केला असून या संपूर्ण घोटाळ्याला हे दोघेजण जबाबदार असल्याचाही उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच डीसीसी घोटाळा प्रकरणातील आरोपींची चौकशी पोलीसांनी सुरू केली होती. ज्या तीन प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू झाली होती, त्यात अंबा सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाचेही प्रकरण होते. अंबा सहकारीचे मेघराज हे विद्यमान चेअरमन होते. पोलीसांनी बोलावल्यानंतर ते चौकशीलाही सामोरे गेले होते.