लग्नाचे दिवसी नगरदेवाचे ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: July 21, 2016 20:46 IST2016-07-21T20:46:50+5:302016-07-21T20:46:50+5:30
गावाची बसफेरी बंद झाल्याने नागरिकांचे व लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांचे झालेले हाल पाहता संतापलेल्या नवरदेवाने गुरुवारी लग्नाच्या दिवसी दुपारी तिवसा तहसीलदारांच्या

लग्नाचे दिवसी नगरदेवाचे ठिय्या आंदोलन
तिवसा येथील घटना : गावात बसफेरीची मागणी
तिवसा, अमरावती : गावाची बसफेरी बंद झाल्याने नागरिकांचे व लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांचे झालेले हाल पाहता संतापलेल्या नवरदेवाने गुरुवारी लग्नाच्या दिवसी दुपारी तिवसा तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले व वणी (ममदापूर) गावात तत्काळ बसफेरी सुरू करण्याची मागणी केली. आश्वासनानंतर नवरदेव पुन्हा मंगल कार्यालयात पोहोचला व वऱ्हाड्यांचा जीव भांड्यात पडला.
तिवसा तालुक्यामधील वणी (ममदापूर) या ग्रामपंचायतीचे सदस्य मुकुंद पुनसे यांचे गुरूवारी तिवसा येथील एका मंगल कार्यालयात गुरुवारी लग्न होते. लग्नाचे सोपस्कार आटोपताच गावात बस देखील येत नाही म्हणून संतापलेल्या नवरदेवाने सहकाऱ्यासह दुपारी ४ वाजता तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार राम लंके यांच्या कक्षात ठिय्या दिला. नवरदेवापाठोपाठ वऱ्हाड्यांनी देखील तहसील कार्यालयात गर्दी केली.
वणी या गावातील रस्ते रेती घाटातून होणाऱ्या जड वाहतुकीने खराब झाले आहेत त्यामुळे गावात येणारी बसफेरी महामंडळाद्वारा बंद करण्यात आली. त्यामुळे वणीसह ममदापूर, काटसूर, इसापूर व नमस्कारी या गावातील नागरिक व तिवसा येथील शाळेत येणारे विद्यार्थी यांना पायदळ किंवा अॅटोने येण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही याचा संताप नवरदेव मुकुंद पुनसे यांना होता व त्यांनी चक्क लग्नाचे दिवसी गावाच्या रस्त्याची दुरूस्ती व बसफेरी सुरू करण्यात यावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. तहसीलदार राम लंके यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वणी येथे बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन दिले व वऱ्हाड्यांचा जीव भांड्यात पडला. शासनाने आश्वासनाची पूर्तता केली नाही तर ३१ जुलै रोजी रस्ता रोको करणार असल्याची माहिती पुनसे यांनी दिली.