दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची मुलगी पोलीस अधिकारी!
By Admin | Updated: June 9, 2016 06:27 IST2016-06-09T06:27:21+5:302016-06-09T06:27:21+5:30
बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची मुलगी पोलीस अधिकारी!
नाशिक : बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. एवढेच नव्हे तर मीना भीमसिंग तुपे या पोलीस अकादमीच्या इतिहासात ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’पदाचा मान मिळविणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
बुधवारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११३ व्या तुकडीचा नाशिकमध्ये दीक्षान्त समारंभ झाला, त्यात मीना यांना ‘स्वॉर्ड आॅफ आॅनर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपूर (खामखेडा) येथील शेतकरी भीमसिंग व शशिकला तुपे यांच्याकडे केवळ चार एकर कोरडवाहू शेती आहे. तुपे यांना चार मुली अन् एक मुलगा. मीना सर्वात मोठ्या. त्यांनी लहानपणापासून वडिलांना शेतीच्या कामात मदत केली. (प्रतिनिधी)
>दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्ट
दुर्दम्य इच्छाशक्ती अन् कष्टाच्या बळावर त्या २०१० मध्ये पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाल्या. खंडाळा येथे त्यांनी संपूर्ण राज्यातून उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर २०१३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली़
त्यातही त्यांनी महिलांमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला होता. तुपे यांचे वडील भीमसिंग (६५) व आई शशिकला (६२) आता थकले आहेत. त्यांच्याबरोबरच तीन लहान बहिणी व भावाची जबाबदारीही मीना यांच्यावर आहे़
>लहानपणी शाळेचे साहित्य मिळत नसल्याने आई-वडिलांचा राग यायचा. मात्र त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती़ परिस्थितीनेच मला ध्येयप्राप्तीसाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती दिली़ पोलीस अधिकारी म्हणून काम करताना सामान्य माणसाला न्याय मिळवून देईन. - मीना तुपे, पोलीस उपनिरीक्षक