मुंबईच्या आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर?
By Admin | Updated: December 31, 2015 00:32 IST2015-12-31T00:32:16+5:302015-12-31T00:32:16+5:30
अहमद जावेद यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपविली जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘आयबी’मध्ये कार्यरत असलेल्या पडसलगीकर

मुंबईच्या आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर?
- जमीर काझी, मुंबई
अहमद जावेद यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपविली जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘आयबी’मध्ये कार्यरत असलेल्या पडसलगीकर यांना पुन्हा ‘होम केडर’ म्हणजेच महाराष्ट्रासाठी रिलिव्ह करावे, असे पत्र राज्य सरकारकडून केंद्रीय गृहविभागाला पाठविण्यात आले आहे. पडसलगीकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मुंबईत परतण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असल्याचे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आयुक्तपदासाठी त्यांच्या स्पर्धेत असलेल्या संजय बर्वे यांचे नाव मागे पडले आहे. विद्यमान आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्ती जाहीर झाली. तथापि, ३१ जानेवारीपर्यंत ते सेवेत असतील. राज्य सरकारने गेल्या आठ सप्टेंबरला आकस्मिकपणे राकेश मारिया यांची पदोन्नती करून, आयुक्तपदाची धुरा अहमद जावेद यांच्याकडे सोपवली. जावेद यांना जेमतेम पावणेपाच महिन्यांचा कालावधी मिळणार, हे निश्चित होते. २० दिवसांपूर्वी त्यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी
नियुक्ती केल्याचे केंद्रीय गृहविभागाने जाहीर केले, तसेच जावेद यांच्यासाठी ‘अपग्रेड’ केलेले आयुक्तपद पुन्हा ‘डाउन ग्रेड’ करून अप्पर महासंचालक दर्जाचे करण्याचा निर्णय झाला
आहे. त्यानुसार, आयबीत कार्यरत असलेले दत्ता पडसलगीकर व संजय बर्वे यांची नावे चर्चेत होती.
त्यात पडसलगीकर यांना पसंती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार, गृहविभागाने केंद्रीय गृहविभागाला पत्र पाठवून त्यांना ‘होम केडर’साठी रिलीव्ह करावे,
असे कळविले आहे. पडसलगीकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रात परतण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमध्ये फारशी अडचण येणार नाही, असे गृहविभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पडसलगीकर १७ वर्षांपासून केंद्रात
- दत्ता पडसलगीकर हे १९८२ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या १७ वर्षांपासून ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामध्ये बहुतांश वर्षे आयबीमध्येच त्यांची सेवा झाली आहे.
- संचालकानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे अप्पर संचालक म्हणून २८ एप्रिल २०१४ पासून ते आयबीत कार्यरत आहेत.
‘केंद्राला पत्र पाठवले’
दत्ता पडसलगीकर यांना महाराष्ट्रात परत पाठविण्यात यावे, यासाठी केंद्राला पत्र पाठविण्यात आले आहे. मुंबईच्या नूतन आयुक्तपदाबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
- के.पी. बक्षी, अप्पर मुख्य सचिव (गृह)