केडीएमसी कर्मचाऱ्यांना गटारीची किक
By Admin | Updated: July 31, 2016 03:11 IST2016-07-31T03:11:05+5:302016-07-31T03:11:05+5:30
आॅन ड्युटी ‘गटारी’ करणाऱ्या महापालिकेच्या सात कर्मचाऱ्यांना आयुक्त ई. रवींद्रन यांनी शनिवारी तत्काळ निलंबित केले.

केडीएमसी कर्मचाऱ्यांना गटारीची किक
कनिष्ठ अभियंता श्याम सोनावणे, सचिन घुटे, ज्ञानेश्वर आडके, विनयकुमार विसपुते, ‘ड’ प्रभागाचे प्लंबर जयप्रकाश शिंदे आणि कामगार महेश जाधव व सचिन चकवे या कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
आषाढ अमावस्या अर्थात गटारी मंगळवारी असली तरी अनेक ठिकाणी शनिवारपासूनच दारू पार्ट्यांना सुरुवात झाली. या मद्यपी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारीच गटारीचा बेत आखला. त्यासाठी त्यांनी चक्क महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रातील हजेरी शेडची जागा निवडली आणि मद्यपान सुरू केले.
पाठलाग करत रहिवासी तेथे जमल्याचे पाहून गटारी साजरी करणाऱ्यांची झिंग उतरली. ड्युटीवर असताना काम करायचे सोडून दारू ढोसणाऱ्या सर्वांना संतप्त नागरिकांनी जाब विचारला आणि सर्वांना अद्दल घडवण्यासाठी गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. झिंगलेल्या मद्यपींना नेमके काय चालले आहे, त्याची उत्तरेही देता येत नव्हती. पण, ड्युटीवरील दारूच्या कार्यक्रमाचे बिंग फुटल्याने घाबरून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रहिवाशांना धक्काबुक्की करत पळ काढला. पण, तोवर हे प्रकरण वरपर्यंत पोहोचले होते. त्याचा गाजावाजा झाला होता. त्यामुळे आयुक्तांनी सातही जणांना निलंबित केले. यापुढे अशा घटना होऊ नयेत, त्यांना आळा घालता यावा, यासाठी आयुक्त रवींद्रन यांनी प्रत्येक हजेरी शेडमध्ये आणि कार्यालयातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
।... आणि सततच्या हेलपाट्यांमुळे फुटले ओल्या पार्टीचे बिंग
पाणीकपात मागे घेतल्यानंतरही कल्याणच्या गणेशवाडी परिसरातील एका इमारतीत पाणीपुरवठा होत नव्हता. त्याचीे रहिवाशांनी तक्रारही केली होती. पाठपुराव्यानंतरनंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना जलवाहिनी बदलून देण्यात आली, पण पाणी आलेच नाही. कामासाठी फक्त खड्डा खणून ठेवला होता. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा रहिवाशांनी जाब विचारला. काम सुरू झाले. काही जण काम करत होते.सतत काहीतरी वस्तू राहिली असल्याचे सांगून एकेक कर्मचारी पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या महापालिकेच्या कार्यालयवजा हजेरी शेडकडे हेलपाटे मारत होता. त्याला कंटाळून रहिवाशांनी हजेरी शेडमध्ये नक्की काय चालले आहे, हे पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांचा पाठलाग केला, तेव्हा तेथे ओली पार्टी सुरू असल्याची बाब उघडकीस आली.