डरॉँव ऽऽ डरॉँव ऽऽ निषेध.. निषेध !
By Admin | Updated: October 7, 2014 13:53 IST2014-10-07T13:53:20+5:302014-10-07T13:53:37+5:30
बक्याच्या काठावर बेडकांचा घोळका जमलेला. अत्यंत गहन विषयावर गंभीर चर्चा करण्यासाठी, तातडीनं बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सर्वांचेच डोळे मोठे झालेले. तसं ते नेहमीच असतात; हा भाग वेगळा!)

डरॉँव ऽऽ डरॉँव ऽऽ निषेध.. निषेध !
होऊ दे चर्चा...
(स्थळ : डबक्याच्या काठावर बेडकांचा घोळका जमलेला. अत्यंत गहन विषयावर गंभीर चर्चा करण्यासाठी, तातडीनं बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सर्वांचेच डोळे मोठे झालेले. तसं ते नेहमीच असतात; हा भाग वेगळा!)
पहिला बेडूक : (नेहमीप्रमाणं खच्चून ओरडत) डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ. आज इथं तमाम 'मंडूक'बांधवांना का बोलावलंय, हे सर्वांच्या लक्षात आलं असेलच.
दुसरा बेडूक : (मागच्या पायानं चिखल झाडत) होय. होय. सध्या 'मानव'जातीकडून आपला 'मंडूकवंश' नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय.
तिसरा बेडूक : (रागारागानं जीभ बाहेर काढून पुन्हा पटकन आत घेत) म्हणूनच तमाम मानवांचा निषेध करण्यासाठी ही तातडीची मीटिंग बोलाविण्यात आलीय. डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ. निषेध. निषेध.
चौथा बेडूक : (जोरजोरात उड्या मारत) थांबा. तीनशे रुपये मिळाले की, कोणत्याही सभेत जाऊन घोषणा देणार्या कार्यकर्त्यांप्रमाणं उगाच अतिउत्साही होऊ नका.
बेडकीण : (छोट्या पिलांना आपल्या पोटाच्या पदराखाली झाकत) त्या मानवांनी आता परत काय केलं ? ्रआपल्या भाईबंदाना पुन्हा त्यांच्या प्रयोगशाळेत नेलं की काय?
पहिला बेडूक : (भल्या मोठय़ा घशातून छोट्या माशाचा आवंढा गिळत) त्या मानवांनी विज्ञानात प्रगती केली, ती केवळ आपल्या जीवावर. पोटं फाडली आपली..अन् पाठ थोपटून घेतली स्वत:ची.
दुसरा बेडूक : (अंगावरचा चिखल झटकत) तरीही आपण डबक्यातल्या घाणीत शांत बसून रहिलो. वेळप्रसंगी अंगावर चिखलही ओढवून घेतला.
तिसरा बेडूक : (डोळे गरागरा फिरवत) पण, ही राजकीय बदनामीची राळ मात्र आता सहन करण्यापलीकडची.
चौथा बेडूक : (चित्रविचित्र आवाज करत) काल-परवा म्हणे, कुणी 'रेल्वे इंजिन'वाल्या नेत्यानं नेहमीच्या तिखट 'राज'कीय शैलीत विरोधकांवर टीका करताना त्यांना चक्क आपली उपमा दिली. 'ते विरोधक म्हणे आपल्यासारखं डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ करतात.' कित्ती मोठ्ठा हा आपला अपमान ?
छोटा बेडूक : (दगडाच्या कपारीतून हळूच बाहेर येत) विरोधकाची टिंगल करताना त्या 'राज'नं म्हणे स्वत:ची इवलीशी 'बेटकुळी'ही दाखविली. अगं आईऽऽ 'बेटकुळी' म्हणजे कोणत्या जातीच्या 'बेडकाची कुळी' गं?
पहिला बेडूक : (त्वेषानं स्वत:चं पोट फुगवत) त्या नेत्याच्या 'बेटकुळी'पेक्षा माझी 'बेडूककुळी' कितीतरी मोठ्ठी.
बेडकीण : (चिडून पाण्यात सूर मारून) हेच ते. इथंच तर चुकतोय आपण. आपली कुवत माहीत नसताना मोठ-मोठी स्पर्धा करायची सवय लागलीय तुम्हाला त्या उमेदवारांसारखी. डबक्याबाहेरचं जग माहीत नाही आपल्याला; अन् बाता तर बैलाच्या आकाराएवढय़ा. यामुळंच तर इतर नेत्यांशी तुलना केल्यानं होतेय आपली घोर बदनामी .
सारे बेडूक : (एक सुरात) म्हणूनच माणसांच्या 'कुपमंडूक' वृत्तीचा निषेध असो. डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ. निषेध. निषेध.
- सचिन जवळकोटे