दुष्काळाची छाया गडद!
By Admin | Updated: July 14, 2014 02:58 IST2014-07-14T02:58:49+5:302014-07-14T02:58:49+5:30
कोरडा गेलेला संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दगा दिल्याने राज्यावरील दुष्काळाचीछाया आणखी गडद झाली आहे

दुष्काळाची छाया गडद!
पुणे : कोरडा गेलेला संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दगा दिल्याने राज्यावरील दुष्काळाचीछाया आणखी गडद झाली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ६६ टक्के कमी पाऊस झाला आहे. धरणे आणि जलाशयांमधील पाणीसाठा टक्केवारीच्या बाबतीत एक अंकी झाला आहे. ही आकडेवारी चिंता वाढविणारी असल्याचे सरकारच्या वतीनेही सूचित केले जात आहे. आधीच्या तुलनेत गेल्या आठवड्यापासून राज्यात दमदार सरींची हजेरी लागली असली तरी महिन्याचा अनुशेष भरून निघणे अवघडच दिसत आहे.
राज्यात जून महिन्यात सरासरीच्या ४१ टक्के कमी पाऊस झाला होता. ती तीव्रता या महिन्यात आणखी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडला असून, तो सरासरीच्या ७० टक्के कमी आहे. त्यापाठोपाठ विदर्भात सरासरीपेक्षा ६७ टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात ६३ टक्के कमी पाऊस झाला आहे. कोकणात मात्र गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत असल्याने तेथील दुष्काळाची तीव्रता थोडी कमी झाली आहे. मात्र अजूनही तेथे सरासरीच्या ५९ टक्के कमी पाऊस आहे.
जून महिन्यात कमी पाऊस झाल्याने राज्यातील जलाशयांनी तळ गाठला आहे. विविध धरणांमधील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भूमी कोरडी झाल्याने पडणारे पावसाचे पाणी जमिनीमध्येच मुरत आहे. त्यामुळे अजूनही धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत नसल्याचे चित्र राज्यभर आहे. आतापर्यंत नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तेथे सरासरीच्या ९५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८४% पाऊस कमी झाला आहे.
राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास वीजनिर्मितीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. सातारा जिल्ह्याची परिस्थिती गंभीर असून, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आठ कोटी देण्यात येतील, असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)