पावसामुळे पुणे अंधारात
By Admin | Updated: July 4, 2016 01:10 IST2016-07-04T01:10:08+5:302016-07-04T01:10:08+5:30
संततधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता़
_ns.jpg)
पावसामुळे पुणे अंधारात
पुणे : गेल्या ७२ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता़ विस्कळीत झालेला वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ववत करण्यात आला.
मुसळधार पावसामुळे झाडे व फांद्या वाहिन्यांवर पडल्याने, काही ठिकाणी साचलेले भूमिगत वाहिन्यांसह फिडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी रात्रीपासूनच महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी भरपावसात दुरुस्तीकामाला सुरुवात केली. अनेक ठिकाणी खंडित झालेल्या भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तथापि, संततधार पावसामुळे दुरुस्तीकामात व्यत्यय येत असल्याने काही भागांत नागरिकांची विजेअभावी गैरसोय झाली. पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरू झाला असून सायंकाळी उशिरापर्यंत शहरी भागातील १० ते १२ रोहित्र दुरुस्तीचे व वीजपुरवठ्याबाबत ग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम सुरू होते.
दरम्यान, मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी विविध ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्तीकामांची पाहणी केली व खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासंबंधीचा आढावा घेतला.
>कर्मचाऱ्यांची तत्परता
हडपसर गाव, गाडीतळ, मांजरी गाव, शेवाळवाडी, माळवाडी भागात खंडित झालेला वीजपुरवठा सुरू झाला आहे. सिंहगड रोड, खडकवासला भागात मुसळधार पावसाने वीजवाहिन्यांना फटका बसला. नदीच्या काठावर असलेल्या वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी अभियंते व कर्मचारी यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुरुस्तीकाम करावे लागले. हिंगणे, माणिकबाग, स्वारगेट, सुभाषनगर, तुकाईनगर, धायरी भागातील वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरू झाला.