दराडे यांना मिळाला नैसर्गिक न्याय
By Admin | Updated: November 2, 2014 01:00 IST2014-11-02T01:00:00+5:302014-11-02T01:00:00+5:30
नागपूर मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात निर्माण झालेल्या राजकीय वादंगात निष्कारण बळी ठरलेले नागपूर सुधार प्रन्यासचे तत्कालीन सभापती प्रवीण दराडे यांची आज शनिवारी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती

दराडे यांना मिळाला नैसर्गिक न्याय
मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती
नागपूर : नागपूर मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात निर्माण झालेल्या राजकीय वादंगात निष्कारण बळी ठरलेले नागपूर सुधार प्रन्यासचे तत्कालीन सभापती प्रवीण दराडे यांची आज शनिवारी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती होताच एका चांगल्या अधिकाऱ्याला नैसर्गिक न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया उपराजधानीत उमटली.
नागपुरात जिल्हाधिकारी आणि नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती म्हणून प्रवीण दराडे यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली. एक प्रामाणिक सचोटीचा आणि लोकांची कामे करणारा अधिकारी म्हणून दराडे नागपुरात लोकप्रिय होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही दिवसांपूर्वी नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला नितीन गडकरी, वेंकय्या नायडू आदींसह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा येणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करतात, अशी टीका करीत त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार घातल्याने काँग्रेसचे कुठलेच नेते कार्यक्रमाकडे फिरकले नाही, असे असतानाही हा भव्य कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. अतिशय अल्पकाळात या समारंभाची नियोजनबद्ध आखणी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दराडे यांची जाहीरपणे प्रशंसा केली होती. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्र्यांना रुचली नाही. त्यामुळे नाराज होऊन राज्य सरकारने त्यांची चार दिवसानंतर तडकाफडकी पुण्यात बदली केली होती. याची तीव्र प्रतिक्रिया जनमानसात तेव्हा उमटली होती.
अनेकांना वाईटही वाटले होते. बदलीचा विरोधही करण्यात आला होता. राजकीय वैमन्यस्यातून दराडे यांची बदली झाल्याची टीका भाजपाने जाहीरपणे केली होती. प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा तेव्हा हा विषय लावून धरला होता. महाराष्ट्रात युतीची सत्ता आल्यास दराडे यांचे पुनर्वसन केले जाईल, असे कयास तेव्हाच लावले जात होते. योगायोगाने महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली आणि नागपूरचेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले.
अखेर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले सचिव म्हणून प्रवीण दराडे यांची नियुक्ती करताच त्यांना नैसर्गिक न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया उमटली. मेट्रोच्या उभारणीसाठी दराडे यांनी जे अथक परिश्रम घेतले, त्याचे फळही त्यांना मिळाले. (प्रतिनिधी)