दप्तराचे ओझे कागदोपत्रीच कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 01:59 IST2016-08-01T01:59:51+5:302016-08-01T01:59:51+5:30
मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची योजना शासनाने जाहीर केली होती

दप्तराचे ओझे कागदोपत्रीच कमी
रहाटणी : मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची योजना शासनाने जाहीर केली होती. मात्र, त्याची ठोस अशी अंमलबजावणी झालीच नसल्याचे सध्या दिसून येत आहे . मात्र, ही अंमलबजावणी फक्त कागदोपत्रीच झाली. शालेय शिक्षण विभाग याबाबत केवळ आदेश आणि सूचना देण्यापलीकडे काहीही करताना दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असल्याने पालक कमालीचे चिंतेत आहेत.
मुलांना शाळेचे दप्तर, त्याचे ओझे व त्या अनुषंगाने होणारे तोटे याचा विचार करून शासनाने गेल्याच वर्षी हे ओझे कमी करण्यासंदर्भात परिपत्रक काढले होते. ओझे कमी करण्यासाठी योजना अमंलबजावण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, ह्या योजना कायमस्वरूपी कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. स्पर्धेच्या युगात दररोज शाळेत काहीना काही वेगळा अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, गुणवत्ता परीक्षा अशा अनेक परीक्षांनी विद्यार्थी हैराण झाले आहेत.
प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अगदी नर्सरीपासून ते वरच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात विविध प्रकाशनांकडून दर वर्षी विविध विषयांच्या पुस्तकांची भर पडताना दिसून येत आहे. त्यामुळे नर्सरीच्या विद्यार्थ्यांचे दप्तर उचलताना पालकांची दमछाक होताना दिसून येत आहे.
काही वेळा विद्यार्थ्यापेक्षा दप्तराचेच ओझे दिसून येत आहे. मराठी माध्यमाच्या शाळांवर शासनाचा काही प्रमाणात अकुंश असल्याने या शाळांतील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी आहे. (वार्ताहर)
>दप्तर ओझ्यापासून मुक्ती कधी?
शिक्षणाचा ताण व दिवसेंदिवस वाढणारे दप्तराचे ओझे यापासून विद्यार्थ्यांची सुटका कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना सतावत आहे. एका विषयासाठी विद्यार्थ्यांना पुस्तक, वही व स्वाध्यायमाला अशी तीन पुस्तके वापरावे लागते . एका विद्यार्थ्याला कमीत कमी सात तासिका असतात, म्हणजे एका विद्यार्थ्याला दिवसाला २१ पुस्तकांचे ओझे झेपावे लागते. हे ओझे कधी कमी होणार, याचीच प्रतीक्षा विद्यार्थी, पालक यांना लागली आहे.