घातक रंगद्रव्याचा डाळिंबसाठा जप्त
By Admin | Updated: December 30, 2014 23:38 IST2014-12-29T23:18:08+5:302014-12-30T23:38:29+5:30
कुपवाडात ‘अन्न व औषध’ची कारवाई

घातक रंगद्रव्याचा डाळिंबसाठा जप्त
सांगली : कुपवाड एमआयडीसीतील दोन कोल्ड स्टोअरेजवर अन्न औषध व प्रशासन विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून कृत्रिम रंगाचा वापर केलेला तीन लाख रुपये किमतीचा डाळिंब साठा जप्त केला आहे. या डाळिंबामध्ये घातक द्रव्ये आढळून आली आहेत. सहायक आयुक्त डी. एच. कोळी यांच्या पथकाने आज, सोमवारी दुपारी ही कारवाई केली.
पंधरा दिवसांपूर्वी पंढरपूर, सोलापूर येथे घातक द्रव्य असलेली डाळिंबे आढळून आली होती. त्यामुळे तेथील दलालांनी हा माल सांगलीकडे पाठवून दिला आहे, अशी माहिती पथकाला
मिळाली होती. त्यानंतर पथकाने आज दुपारी कुपवाड एमआयडीसीतील श्री दत्त कोल्ड स्टोअरेज व गोमटेश कोल्ड स्टोअरेज या दोन ठिकाणी एकाचवेळी छापा टाकला.
दत्त कोल्ड स्टोअरेजमधून ९६२ किलो डाळिंबे जप्त केली. याची किमत ७७ हजार रुपये आहे, तर गोमटेश कोल्ड स्टोअरेजमधून २ हजार ९०४ किलो डाळिंब साठा जप्त केला. त्याची किंमत २ लाख ३२ हजार आहे. (प्रतिनिधी)