दिघीत ४० वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी ठरतेय धोकादायक
By Admin | Updated: January 16, 2017 01:50 IST2017-01-16T01:50:48+5:302017-01-16T01:50:48+5:30
ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली

दिघीत ४० वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी ठरतेय धोकादायक
दिघी : ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली असून, शेवटच्या घटका मोजत आहे. टाकीच्या मुख्य कॉलमला तडे गेल्याने टाकीशेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, संबंधित प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहणार आहे का, असा सवाल केला आहे.
१९७८ मध्ये दिघीतील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. या टाकीची एक लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता होती. अंदाजे तीस वर्षे अविरत सेवा करून शेवटी या टाकीची झीज होण्यास सुरुवात झाली. कालांतराने धोकादायक ठरू पाहणा-या टाकीतील पाणीपुरवठा साठवणे बंद करून टाकी मोकळी करण्यात आली. दरम्यान दिघी गावचा पालिकेत समावेश झाल्यानंतर टाकी पाडण्यासंदर्भात ठराव केला.
मात्र प्रत्येक वेळी आयुक्त व प्रशासकीय अधिकारी यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतरसुद्धा टाकी पाडण्याविषयी कुठलीही कारवाई झाली नाही. उलट वर्षानुवर्षे जाऊन ४० वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. ऊन व पावसाच्या तडाख्याने टाकीची अवस्था मोडकळीस आलेली आहे. मुख्य चार कॉलमची झीज होऊन भरमसाठ वजन पेलण्याची क्षमता नसून, आतील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. (वार्ताहर)
>दिघी गावठाणातील पालिकेच्या शाळेजवळच ही धोकादायक टाकी उभी आहे. टाकीच्या बाजूच्या मोकळ्या जागेत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, स्थानिक रहिवाशांची लहान मुले येथे खेळताना दिसतात. टाकीची अवस्था लक्षात घेता ती कधी कोसळून पडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे टाकीच्या बाजूला असलेले विजेचे उघडे तार तुटून मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कधी काळी जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी उद्या दिघीकरांचा काळ ठरणार नाही, याची दक्षता घेऊन संबंधित प्रशासनाने पाण्याची टाकी पाडण्याची मागणी केली आहे.