येळ्ळूरमध्ये कन्नडिगांची दंडेली, पुन्हा महाराष्ट्राचा फलक काढला
By Admin | Updated: July 27, 2014 12:06 IST2014-07-27T11:56:22+5:302014-07-27T12:06:57+5:30
बेळगावमधील मराठी भाषिकांनी येळ्ळूर येथे उभारलेला 'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' हा फलक कर्नाटक पोलिसांनी शनिवारी रात्री पुन्हा काढून टाकला आहे.

येळ्ळूरमध्ये कन्नडिगांची दंडेली, पुन्हा महाराष्ट्राचा फलक काढला
ऑनलाइन टीम
बेळगाव, दि. २७- बेळगावमधील मराठी भाषिकांनी येळ्ळूर येथे उभारलेला 'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' हा फलक कर्नाटक पोलिसांनी शनिवारी रात्री कडेकोट बंदोबस्तात काढून टाकला आहे. या घटनेनंतर येळ्ळूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी मराठी भाषिक नेत्यांची धरपकडही सुरु केली आहे. कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिक महिला व तरुणांवर सौम्य लाठीमार केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
मराठी अस्मितेचे प्रतीक असलेल्या येळ्ळूरमधील 'महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर' हा फलक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी काढण्यात आला होता. याविरोधात मराठी भाषिकांनी अभूतपूर्व अस्मितेचे दर्शन घडवीत शनिवारी हा फलक पुन्हा उभा केला. मात्र रात्री कर्नाटक पोलिसांनी पुन्हा एकदा दंडेली दाखवत हा फलक उद्धवस्त केला. हा प्रकार समजताच मराठी भाषिकांनी विरोध दर्शवला. मात्र कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करत महिला व तरुणांवर लाठीमार केला. मराठी भाषिक तरुण तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकडही सुरु करण्यात आली आहे. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. येळ्ळूर आणि सभोवतालच्या परिसरात उद्या रात्री १२ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून या भागाला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.